प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
नागपूर,17सप्टेंबर: राज्याच्या विकास कामांसाठी राज्य सरकारवर केंद्राकडे भीक मागावी लागते अशी टीका श्रीहरी अणे यांनी केली आहे.महाराष्ट्र हे कफल्लक राज्य आहे असंही अणे यावेळी म्हणाले.
देशात अच्छे दिन आणायला पैसे लागतात पण महाराष्ट्र सरकार भिकार सरकार आहे. सरकारच्या खिशाला भोक आहेत अशी टीका राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अॅड श्रीहरी अणे यांनी केली आहे.राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी नोकरशाही आणि कर्ज फेडण्यासाठी ६० टक्के पैसे जातात तर उरलेले ४० टक्के पैसे हे जीएसटी आल्यापासून केंद्र सरकार घेऊन गेलं अशी परिस्थिती असल्याचं अणे म्हणाले.
श्रीहरी अणे यांनी बोलताना अनेक विषयांवर केंद्र सरकारवरही टीका केली. विदर्भाची सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी दाद मागायची असेल तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याकडून मागायची नाही. या लोकांची नेतेगिरी मोठी आहे असे सांगत अॅड श्रीहरी अणे यांनी देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोनच नेते असल्याच सांगून टीका केली. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे की अमित शहा हे मला आजही कळलं नसल्याचा घणाघातही अॅड अणेनी लगावला. विदर्भाच्या आतल्या जिल्ह्यांमधील परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र सरकार या ठिकाणी अस्तित्वात नाही अशी परिस्थिती असल्याचं अॅड. अणे म्हणाले.
विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याच्या मागणीसाठी रक्ताने सह्या करून पाठिंबा देण्यासाठी रक्ताक्षरी मोहिम आयोजीत करण्यात आली होती. विदर्भातून १० हजार लोकांनी आपल्या रक्ताने सही करून विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे पत्र विदर्भवादी नेते अँड श्रीहरी अणे यांच्याकडे या प्रसंगी सोपवले. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा