कोकणातील भाजप नेत्यामुळे शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांना थेट वाजपेयी सरकारची आठवण

'शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात काम करण्याची धमकी भाजपच्या कुणी जठारने दिली. हा ‘जठाराग्नी’ मुख्यमंत्र्यांनी वेळीच शांत करावा'

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 07:22 AM IST

कोकणातील भाजप नेत्यामुळे शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांना थेट वाजपेयी सरकारची आठवण

मुंबई, 25 फेब्रुवारी : कोकणातील भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी नाणार प्रकल्पाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. 'नाणार प्रकल्प करा. नाही केलात तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात काम करण्याची धमकी भाजपच्या कुणी जठारने दिली. हा ‘जठाराग्नी’ मुख्यमंत्र्यांनी वेळीच शांत करावा,' असं आवाहन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलं आहे.

'एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांना जनता माफ करणार नाही,' असं म्हणत शिवसेनेनं प्रमोद जठार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख?

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत व नाणार होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या प्रकल्पासाठी जी भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे तीदेखील निवडणूक आचारसंहितेपूर्वीच मागे घेतली जाईल असेही स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही नाणार समर्थनाची मोर्चेबांधणी केली जात आहे. नाणार विष प्रकल्पाचे हे समर्थक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, इतकेच नव्हे तर हा विषारी प्रकल्प व्हायलाच पाहिजे असे ठणकावून सांगणार आहेत. हा नीचपणा जितका आहे तितकाच निर्घृणपणा आहे. पालघर जिल्हय़ातील तारापूर प्रकल्पामुळे सध्या त्या परिसरात भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे कॅन्सरसारखे आजार वाढले आहेत. जमिनीतून व पिण्याच्या पाण्यातून विष निघत आहे व समुद्रही विषारी झाला आहे. त्यामुळे मासेमारीवर जगणाऱ्या समाजापुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. पालघर हा कोकणचाच एक भाग असून अशा अनेक विषारी प्रकल्पांनी कोकणची दैना उडाली आहे. कोकणात समुद्र आहे हा तेथील जनतेचा गुन्हा झाला काय? आहे तो निसर्ग, पर्यावरण वाचवता येत नाही. मग उरलेला निसर्ग खतम का करताय? कोकणचे ‘गॅस’ चेंबर करा, माणसे मारा, पण नाणार प्रकल्प करा. नाही केलात तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात काम करण्याची धमकी भाजपच्या कुणी जठारने दिली. हा ‘जठाराग्नी’ मुख्यमंत्र्यांनी वेळीच शांत करावा. एक-एक खासदाराचे महत्त्व सध्या श्री. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आहे. फक्त एका खासदारामुळे वाजपेयींचे सरकार कोसळले होते याचे भान ज्यांना नाही ते देश व समाजाचे मारेकरी आहेत. क्षुद्र स्वार्थ व जमीन व्यवहारातील मलिदा यासाठी नाणार विष प्रकल्पाचे समर्थन करणाऱयांना जनता माफ करणार नाही.


Loading...

VIDEO : आपलंच चित्र पाहून उदयनराजे झाले भावूक, चित्रकाराची थोपाटली पाठ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...