News18 Lokmat

'युती'वर 'सामना'चा अग्रलेख आलाच नाही!

एकही असा दिवस गेला नसेल ज्या दिवशी 'सामना'तून भाजप आणि नरेंद्र मोदींना झोडपलं गेलं नसेल. 'सामना'त जे अग्रलेख येत होते त्यावरून देशभरातल्या माध्यमांना भरपूर खाद्यही मिळत होतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 03:43 PM IST

'युती'वर 'सामना'चा अग्रलेख आलाच नाही!

मुंबई 19 फेब्रुवारी :  ऐकमेकांना चार वर्ष यथेच्छ शिव्या घातल्यानंतर सोमवारी 18 फेब्रुवारीला भाजप आणि शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेसाठी अखेर युती केली. ही युती केवळ फक्त निवडणुकीसाठी नाही तर त्यापेक्षाही अधिक काही आहे अशी भलामणही नेत्यांनी केला. सोशल मीडियावर अपेक्षेप्रमाणे लोकांनी शिवसेना आणि भाजपला 'ट्रोल' केलं. आधीच्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्स टाकल्या. 'सामना'च्या अग्रलेखाचे मथळे टाकले. पण एवढी मोठी राजकीय घटना घडल्यानंतरही  आजचा 'सामना' अग्रलेख मात्र त्यावर आला नाही याचं सर्वांना आश्चर्य वाटलं.


गेली चारवर्ष शिवसेनेच्या तोफा भाजप, नरेंद्र मोदी, राज्य आणि केंद्र सरकारवर धडधडत होत्या. नरेंद्र मोदी हे या तोफांचं मुख्य टार्गेट होतं. शिवसेनेच्या या तोफखान्याचे प्रमुख होते खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत. आपल्या धार धार लेखनीने राऊतांनी भाजपला घायळ केलं होतं. माध्यमांनाही जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा राऊत प्रतिक्रियेसाठी पुढे येत आणि चपखल युक्तिवादाने भाजपला कोंडीत पकडत.


एकही असा दिवस गेला नसेल ज्या दिवशी 'सामना'तून भाजप आणि नरेंद्र मोदींना झोडपलं गेलं नसेल. 'सामना'त जे अग्रलेख येत होते त्यावरून देशभरातल्या माध्यमांना भरपूर खाद्यही मिळत होतं. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती ती युतीवर 'सामना'चा अग्रलेख काय म्हणतो याची. मात्र युतीवर 'सामना'त अग्रलेख आलाच नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. पुलमावातल्या घटनेवर अग्रलेख लिहून त्यातून सरकारवर टीका मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

Loading...


सामान्य नागरिक आणि पत्रकारांप्रमाणेच शिवसैनिकांनाही 'सामना'च्या अग्रलेखाची उत्सुकता होती. युतीच्या घोषणा झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या संजय राऊतांनी मात्र प्रतिक्रिया व्यक्त न करणच पसंत केलं. आम्ही आज जेव्हा राऊतांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोनवरून प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. राऊत हे काश्मीरला गेले आहेत अशीही माहितीही कळाली.


युतीवरून शिवसेनेत दोन गट पडले होती अशी माहितीही सूत्रांनी दिली. भाजपशी युती न करता स्वबळाच्या घोषणेवर कायम राहात पुढे जावं असं एका गटाला वाटत होतं. तर खासदार आणि आमदारांना युती व्हावी असं वाटत होतं. जे कधी निवडणुकीला सामोरे जात नाही त्यांना युती नको असं वाटतं असं मत काही खासदारांचं होतं. त्यामुळे 'सामना'तून यावर काय लिहिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.


'युती' होण्याआधीचे 'सामना'चे हे काही 'अग्रलेख'

'रोजगाराची ‘जुमलेबाजी’ करून सत्य तात्पुरते झाकता येईलही, पण देशातील बेरोजगार तरुणांची अशी थट्टा करू नका. गेल्या निवडणुकीत याच हातांनी मोठय़ा अपेक्षेने तुम्हाला बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. आज तेच हात तुमच्या जुमलेबाजीविरोधात शिवशिवत आहेत. जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात, हे कुणीही विसरू नये.'


'राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. मोदी यांनी हे परखडपणे सांगितले ते बरे झाले व गेल्या चार-पाच वर्षांत  ते प्रथमच खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. इतर अनेक विषयांना त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न आहे.'


'शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चीट इंडिया’ प्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे? श्री. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत. प. बंगालातील ठिणगी वाढू नये. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे.'

VIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...