सेनेची यादी जाहीर, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बुटाने मारणाऱ्या सेना खासदाराचा पत्ता कट

सेनेची यादी जाहीर, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बुटाने मारणाऱ्या सेना खासदाराचा पत्ता कट

या यादीत उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या जागी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

22 मार्च : भाजपपाठोपाठ शिवसेनेनंही लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 23 पैकी 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या जागी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उस्मानाबादचे शिवसेनेचे वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट झाला आहे. गायकवाड हे उस्मानाबादमधून निवडून आले होते. गायकवाड हे चर्चेत आले ते विमानप्रवासात कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणामुळे.

काय आहे प्रकरण?

मार्च 2017 मध्ये रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केली होती. गायकवाड हे दिल्ली- पुणे विमानातून प्रवास करीत होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं. पण त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसण्यास सांगण्यात आलं. यावरुन विमानातील कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. या शाब्दिक वाद वाढत गेल्यानं संतापलेल्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला सँडलने मारहाण केली होती. गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला तब्बल 25 वेळा बुटाने मारहाण केल्याची कबुली दिली. त्यांच्या या कृत्यानंतर एअर इंडियाने त्यांच्यावर काही काळ विमान प्रवासावर बंदीही घातली होती. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं गायकवाड यांचं जाहीर समर्थन केलं होतं. शिवसैनिकांनी उस्मानाबादमध्ये बंदही पाळला होता. तसंच महाराष्ट सदनमध्ये खराब जेवणावरूनही गायकवाड यांनी राडा घातला होता.

उमेदवारी का नाकारली?

या प्रकरणामुळे रवींद्र गायकवाड प्रसिद्धीझोतात जरी आले असले तरी मतरसंघात हवे तसे काम नव्हते. आपल्याच मतदारसंघात शिवसैनिक त्यांच्यावर नाराज होते. एवढंच नाहीतर गायकवाड हे आपल्या मतदारसंघात फिरकत सुद्धा नव्हते. त्यामुळे ते 'नाॅट रिचेबल' जास्त राहत होते. तसंच गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादीला मदत केल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. अलीकडेच उमेदवार निवडीची चर्चा सुरू असतानाही गायकवाड मातोश्रीवर कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे सेनेकडून गायकवाड यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. अखेर गायकवाड यांच्याऐवजी माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निंबाळकर हे पदमसिंह पाटील यांचे कट्टर विरोधक तसंच जनसंपर्क याच मुद्द्यावर घेऊन ओमराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून कोण?

राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद मतदारसंघातून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आहे. पण आता पद्मसिंह पाटील यांच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. पद्मसिंह पाटील यांच्या नावाने उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आल्याने ते पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. तेर इथल्या सोमनाथ मुळे यांनी पद्मसिंह पाटील यांच्या नावाने 4 अर्ज खरेदी केले आहेत. या सर्व घडामोडींमुळे उस्मानाबादमधून राष्ट्रवादीकडून नक्की कुणाला संधी जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाला आहे.


शिवसेनेचे असे आहेत उमेदवार

1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे

3) उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर

4) ठाणे - राजन विचारे

5) कल्याण - श्रीकांत शिंदे

6) रायगड - अनंत गिते

7) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत

8) कोल्हापूर - संजय मंडलिक

9) हातकणंगले - धैर्यशिल माने

10) नाशिक - हेमंत गोडसे

11) शिर्डी - सदाशिव लोखंडे

12) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील

13) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे

14) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

15) बुलढाणा - प्रतापराव जाधव

16) रामटेक - कृपाल तुमाने

17) अमरावती- आनंदराव अडसूळ

18) परभणी- संजय जाधव

19) मावळ - श्रीरंग बारणे

20) हिंगोली-हेमंत पाटील

21) उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर


=======================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Mar 22, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या