News18 Lokmat

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता

नारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे .

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2017 07:08 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या सेना- भाजपमध्ये अस्वस्थता

दिनेश केळुस्कर, 14 एप्रिल : नारायण राणे भाजपात जातील तेव्हा जातील पण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्गातल्या शिवसेना आणि भाजपामध्ये अस्वस्थता आहे . सिंधुदुर्गातल्या भाजप कार्यकर्त्यांनी तर आत्तापासूनच राणेंना भाजपमध्ये येण्यास विरोध दर्शवलाय.

सिंधुदुर्गातली भाजप सक्षम आहे, इतर पक्षातले नेते आणून पक्ष वाढेल या मताशी आपण सहमत नसून पक्ष वाढायचा असेल तर पक्षाला केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेची ताकद द्या असे खडे बोल सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्वकियानाच सुनावलेयत. त्यामुळे राणेंना भाजपात प्रवेश द्यायचा झालाच तर भाजप नेतृत्वाला स्थानिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे .

दुसरीकडे शिवसेनेनेही आता या आगीत तेल ओतायला सुरुवात केलीय. राणे स्वार्थासाठी सत्तेत जात असून ते जर भाजपात गेलेच तर राणेंच्या स्वार्थीपणाचा आपण जनतेत पर्दाफाश करू असं राणेंना पराभूत करणारे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय . राणे भाजपात गेले तर उलट कॉन्ग्रेसचे कार्यकर्ते सेनेकडे येतील आणि शिवसेना अधिक जोमाने वाढेल असं सूचित करुन नाईक यांनी राणे समर्थकांना बुचकळ्यात टाकलय.

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे गुरुवारी ( 13 एप्रिल ) कणकवलीत परतले . राणेंनी शुक्रवारीही प्रसारमाध्यमांशी न बोलता आपली खाजगी कामं करण्यात वेळ घालवला. आता राणे किती दिवसात राजकीय भूकंप करतात की करणारच नाहीत या बाबत सिंधुदुर्गात उलटसुलट चर्चा सुरू झालीय. राणे 18 एप्रिलपर्यंत काही निर्णय घेतील अशीही एक चर्चा त्यांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळतेय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...