ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पाटील यांचं निधन

सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री, माजी खासदार व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे आज (शनिवार) पहाटे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2017 02:29 PM IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव पाटील यांचं निधन

22 जुलै : सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री, माजी खासदार व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे आज (शनिवार) पहाटे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ते शिरपूर येथे राहात होते.

काही दिवसापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री उशिरा त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले. पहाटे चारला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अनिता देशमुख व गीता पाटील या दोन मुली, नातू तथा अभिनेता प्रतीक बब्बर असा परिवार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होत.

शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू (कै.) उत्तमराव पाटील, वहिनी (कै.) लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.

सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. 1982 मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. जागतिक ऊस व बिट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. केंद्र शासनातर्फे त्यांना पदमभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.

शिवाजीराव पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 24) सकाळी 11 ला शिरपूर येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यसंस्कार होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2017 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...