तानाजी सावंतांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद

तानाजी सावंतांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद

शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत.

  • Share this:

सोलापूर, 16 जून- शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या रुपाने माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. तानाजी सावंत यांच्या शपथविधीनंतर माढा तालुक्यात फटाक्यांच्या आतशबाजीसह मोठ्याप्रमाणात जल्लोष करण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्ये शहरात ठिकठिकाणी जल्लोष करत आहे.

यामुळेच सावंतांचा मंत्रिमंडळात सेनेकडून समावेश..

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खा.रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. निंबाळकर यांना तानाजी सावंत यांनी एकहाती प्रचार करत निवडून आणले. यामुळेच त्यांचा मंत्रिमंडळात सेनेकडून समावेश झाल्याचे मानण्यात येत आहे. शिवजलक्रांती घडवून तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले. एक महिन्याच्या फरकानेच यवतमाळ येथून विधानपरिषद लढविण्याची त्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. या विजयाने शिवसेनेत त्यांचे महत्त्व वाढले होते. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी त्यांचेवर शिवसेनेने सोपवली आहे.

'लक्ष्मी'पुत्र अशी शिवसेनेत ओळख..

प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. उस्मानाबादच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. विशेष म्हणजे कोणतेही मोठे आंदोलन न करता सांवत यांनी शिवसेनेत मोठे स्थान निर्माण केले आहे. 'लक्ष्मी'पुत्र अशी त्यांची शिवसेनेत ओळख आहे. सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देखील सावंत यांच्याकडे आहे. सावंत यांनी राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तिनदा निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून दोनदा तर एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली.  उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याची उभारणी करून त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.  त्यामुळे साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी त्यांची ओळख आहे.

सावंताना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेत नाराजी..

शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी पसरली आहे. तानाजी सावंताना मंत्रिपद मिळाल्याने निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा परिषदेवरील आमदारांना मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समोर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर आहे.


VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 01:05 AM IST

ताज्या बातम्या