S M L

शरद पवार VS बाळासाहेब विखे पाटील : 1991 च्या निवडणुकीत काय घडलं होतं ?

सुजय विखे पाटील यांच्यासाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिला तेव्हापासूनच शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातला वाद विकोपाला जाणार, अशी चिन्हं दिसत होती आणि अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या जुन्या वादानं डोकं वर काढलं.

Updated On: Mar 15, 2019 03:17 PM IST

शरद पवार VS बाळासाहेब विखे पाटील : 1991 च्या निवडणुकीत काय घडलं होतं ?

साहेबराव कोकणे

अहमदनगर, 15 मार्च : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावरून आघाडीमध्ये ही बिघाडी झाली आहे.

सुजय विखे पाटील यांच्यासाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिला तेव्हापासूनच शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातला वाद विकोपाला जाणार, अशी चिन्हं दिसत होती आणि अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या जुन्या वादानं डोकं वर काढलं.


यावेळी चव्हाट्यावर आलेला हा वाद विकोपाला गेला होता 1991 च्या निवडणुकीत. तेव्हाही शरद पवार आणि बाळासाहेब विेखे पाटील यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरूच होत्या. त्यातच बाळासाहेब विखे पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंडाचं निशाण फडकवलं होतं.

राजीव गांधींविरुद्ध बंड

बाळासाहेब विखे पाटील जाहीरपणे राजीव गांधींच्या विरोधात बोलत असत. त्यामुळे अर्थातच त्यांना काँग्रेसचं तिकीट नाकारण्यात आलं आणि यशवंतराव गडाख यांना नगरमधून उमेदवारी देण्यात आली. बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना जनता दलाचा पाठिंबा होता.

Loading...

या निवडणुकीत काहीही करून बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव झाला पाहिजे, असं म्हणत राजीव गांधींनी त्यांच्या पराभव करण्याची जबाबदारी शरद पवारांवर सोपवली होती.

पैसे वाटल्याचा आरोप

बाळासाहेब विखे पाटील यांनी मतदारांना 5 हजार सायकली वाटल्या आणि पैसेही वाटले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 'त्यांनी सायकली आणि पैसे वाटले असतील तर ते तुम्ही घ्या पण मतदान मात्र काँग्रेसलाच करा', असं शरद पवार आणि यशवंतराव गडाख जाहीर सभांमध्ये म्हणाले होते, असाही आरोप झाला.

बाळासाहेब विखे पाटील यांनी जनता दलाचा पाठिंबा मिळवण्यासाठी 20 लाख रुपये दिले, असा आरोपही यशवंतराव गडाख यांनी सोनईच्या सभेत केला होता.

वाद गेला कोर्टात

या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव करून शरद पवारांनी यशवंतराव गडाख यांना निवडून आणलं. या पराभवानंतर विखे पाटील कोर्टात गेले.

यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी आपलं चारित्र्यहनन केलं, भ्रष्ट मार्गाचा वापर करून ते निवडून आले. त्यामुळे त्यांची निवड बेकायदेशीर ठरवा आणि मला विजयी घोषित करा, अशी याचिका बाळासाहेब विखे पाटील यांनी केली होती.

शरद पवारांवर आरोप

या याचिकेत विखे पाटलांनी शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या भाषणाचे पुरावेही जोडले होते. या खटल्यात शरद पवारांना अनेक वेळा कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या आणि बदनामीला सामोरं जावं लागलं.

भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याचा वापर करून विखे पाटील यांनी शरद पवारांना चांगलंच अडचणीत आणलं होतं. बाळासाहेब विखे पाटील हा खटला जिंकले आणि यशवंतराव गडाख यांची निवड कोर्टाने रद्द केली.

मुलाच्या प्रचाराला वडील येणार नाहीत याचं दुःख : सुजय विखे-पाटील

पुढे शरद पवारांनी या खटल्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी घोषित करण्याचा निर्णय रद्द झाला. या प्रकरणी शरद पवारांना बजावलेली नोटीसही रद्द करण्यात आली.

सहकार क्षेत्रातल्या वर्चस्वावरून वाद

या खटल्यामुळे शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखे पाटील यांच्याविरुद्ध चांगलाच राग आहे. तसंच सहकार क्षेत्रात आपलंच वर्चवस्व राहावं यासाठी शरद पवारांनी विखे पाटलांच्यावर अधिकार गाजवायला सुरूवात केली त्यालाही बाळासाहेब विखे पाटील बधले नाहीत.

बाळासाहेब विखे पाटील यांना शरद पवारांचा एवढा विरोध असूनही ते शिर्डीमधून 7 वेळा खासदार झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे दोघंही शरद पवारांना आव्हान देतायत. विखे पाटील घराणं आणि शरद पवार यांच्यातलं हे वैर आघाडीतल्या बिघाडीलाही कारणीभूत झालं आहे.

==============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 03:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close