'मुख्यमंत्र्यांना जनाची नाही मनाची लाज असती तर राजीनामा दिला असता'

'मुख्यमंत्र्यांना जनाची नाही मनाची लाज असती तर राजीनामा दिला असता'

'ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.'

  • Share this:

गडचिरोली, 01 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. या संपूर्ण प्रकारावर गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर शरद पवारांनी ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात 16 एसआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडले.'



मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा

शरद पवार याच ट्वीटला उत्तर देत म्हणाले की, 'गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.' अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, 15 पोलीस शहीद

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.

कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या. त्यातून 25 जवान प्रवास करत होते. त्यातल्या 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर जखमी आहेत.

या हल्ल्यापूर्वी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली. या घटनेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी मंगळवारी(30 एप्रिल) रात्री 11 ते 3 वाजण्याच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं आहे.पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं. या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली आहेत. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याआधीही माओवाद्यांनी रस्ते तयार करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात अशी विकासकामं करताना माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांना कसं रोखायचं, याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

VIDEO: नक्षलवाद्यांचा पुन्हा भ्याड हल्ला, 15 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 04:49 PM IST

ताज्या बातम्या