पावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन ?

पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनाने काय दिलं. यापेक्षाही या अधिवेशनाने काय शिकवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत कुठलंही आंदोलन नाही, घोषणा नाही, स्थगन प्रस्ताव नाही असं गेल्या 10 वर्षांतील पहिलंच अधिवेशन पाहिलंय...राज्यात प्रतिस्पर्ध्यांचा गेम करण्याच्या नादात जनता मात्र सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये लाथाळलेला फूटबॉल बनून गेलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2017 06:38 PM IST

पावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन ?

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी

पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनाने काय दिलं. यापेक्षाही या अधिवेशनाने काय शिकवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत कुठलंही आंदोलन नाही, घोषणा नाही, स्थगन प्रस्ताव नाही असं गेल्या 10 वर्षांतील पहिलंच अधिवेशन पाहिलंय. 2 आठवडे होतात तोच मंजुळा शेट्येचा विषय चर्चेत येतो आणि संपतोही... दुष्काळ, कायदा सुव्यवस्था, जलयुक्त शिवार, मराठा मोर्चा विषय बाजूला पडतो, आणि वंदे मातरम् च्या विषयावर वातावरण तापलं. नंतर काय तर भांडणारे भाजप आमदार राज पुरोहित, 'एमआयएम'चे इम्तियाज जलील जेवताना, फुटबॉल खेळताना 'तुझ्या गळा माझ्या गळा' अशा आविर्भावात एकरूप झालेले जनतेनं पाहिलेत.

दुसरा आठवडा संपतो न संपतो तोच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं प्रकरण समोर येतं. एका मागून एक प्रकरणं बाहेर आल्याने या प्रकरणांमागे नक्की कोण? याविषयी शहाण्याला सांगायला नको. तोच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं प्रकरण समोर आणण्यात आलं. मोपलवार यांचा पदभार काढण्यात आला. याच वेळी अविर्भावात असलेल्या प्रकाश मेहता यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला. भक्कम पुराव्यासाठी आणखी प्रकरणं समोर येत गेली. प्रकाश मेहाता यांच्या नावातील "पीएम" बाहेर पडून त्यावर "सीएम"ने कशी पकड घेतली, हे खुद्द प्रकाश मेहता यांना देखील समजू शकलं नाही.

प्रकाश मेहता यांच्या नंतर शिवसेनेला पारदर्शी मुद्दा मिळतो न मिळतो तोच सुभाष देसाई यांच्या एमआयडीसीचं 31 हजार एकराचं प्रकरण बाहेर आलं आणि सुपात असलेली शिवसेना जात्यात आली, आणि देसाईंबरोबर सेनाही भरडली गेली.

याच दरम्यान मराठा मोर्चाचे भूत मानगुटीवर बसतं की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच भाजपचा मराठा हुकुमी एक्का चंद्रकांत पाटील यांना पुढे करत मराठा नेत्यांबरोबर चर्चेचा गळ टाकण्यात आला. सोबतीला भाजपच्या वाटेवर आस लावून बसलेल्या नारायण राणे यांचा सल्ला शिरसावंद्य मानन्यात आला. राणेंची शिष्टाई मराठा मोर्चाला कामी आली.

Loading...

या बदल्यात राणेंना भाजपमध्ये प्रवेश कधी मिळणार ? हा प्रश्न चर्चेचा असला तरी, या अधिवेशनात असलेली सर्वात मोठी डोकेदुखी राणेंमुळे सध्यातरी संपली आहे. भाजपचं दार कधी उघडतं याकडे डोळे लावून बसण्यापलीकडे काहीही उरलेलं नाही हे राणेंनाही काहीसं उशिरा समजलंय.

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई प्रकरणात खडसेंनी आपली मनातली खदखद बाहेर काढली. जो न्याय खडसेंना त्या न्यायाने मेहतांचा राजीनामा का नाही, या मागणीने मेहतांचा फास अधिक घट्ट करण्यात मुख्यमंत्र्यांना अधिकच बळ मिळाले.

मंत्रिमंडळात "पीएम" चा शिक्का लागलेल्या प्रकाश मेहता आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या चौकशीची घोषणा करत दिग्गज नेत्यांना आपलं आश्रित करण्यात मुख्यमंत्र्यांना यश मिळालं. अस्वस्थ असलेल्या खडसे यांना " भोसरी एमआयडीसी प्रकरण तपासून पाहू असं सांगत" त्यांचं कमबॅक पुन्हा लांबणीवर टाकलं गेल्याचं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर, खडसे सभागृहातून बाहेर जाताना त्यांच्या देहबोलीतून हे स्पष्ट दिसत होते.

जनतेला मिळालं काय? राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था, आरोग्य विभागाचा बोजवारा, मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा फियास्को, शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार, कुपोषित मुलांचा पोषण आहार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलयुक्त शिवारातील भ्रष्टाचार, पाण्याचे न मिळालेले टँकर, पावसाने दिलेली ओढ, त्यामुळे महाराष्ट्रामधील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात शेतकरीच कोलमडलेत. यंदा धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ही पिकंच येणार नाहीत, ही कल्पना आली असताना शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकार विरोधातील आमदारांनी 'ब्र' काढू नये यापेक्षा दुर्दैव ते काय ? ग्रामीण भागातील आमदारांनी या प्रश्नावर किती आवाज उठवला, किती प्रश्न लावले? कुणाचा दबाव ? या प्रश्नापेक्षा मुख्यमंत्री आणि आमदार फुटबॉल मॅचला हजेरी लावत असतील तर यावर न बोललेलंच बरं, मेहता, मोपलवार आणि सुभाष देसाईंवर उत्तर देऊन राज्यात उर्वरित प्रश्नांना उत्तरच नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे का? आणि कशासाठी? राज्याचा कुटुंबप्रमुखच मुलांना चांगले कपडे घालून त्यांचं खपाटीला गेलेलं पोट झाकतोय अशीच काहीशी अवस्था राज्याची झालीय...राज्यात प्रतिस्पर्ध्यांचा गेम करण्याच्या नादात जनता मात्र सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये लाथाळलेला फूटबॉल बनून गेलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2017 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...