बेळगावच्या मुलीमुळे बदलला आर्यलंडचा गर्भपाताचा कायदा

बेळगावच्या डॉ. सविता हलपन्नावर यांच्यामुळे आर्यलंडमध्ये गर्भपाताचा कायदा रद्द करण्यात आला. पण जेव्हा कायदा बदलला तेव्हा सविता या जगात नव्हत्या.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 28, 2018 08:14 PM IST

बेळगावच्या मुलीमुळे बदलला आर्यलंडचा गर्भपाताचा कायदा

संदिप राजगोळकर,कोल्हापूर,ता. 28 मे: ती मुळची बेळगावची. लग्नानंतर ती आयर्लंडमध्ये स्थायिक झाली आणि सुखाचा संसार सुरु असतानाच आर्यलंडमधल्या एका कायद्यामुळं तिला आपला जीव गमवावा लागला. मात्र तिच्या मृत्यूने आर्यलंडमध्ये एक चळवळ उभी राहिली आणि तब्बल 155 वर्षांचा जुना कायदा बदलावा लागला. या बदलाला कारणीभूत ठरल्या मुळच्या बेळगावच्या डॉ. सविता हलपन्नावार.

डॉ. सविता हलपन्नावर या मुळच्या बेळगावच्या. लहानपनापासून डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. बेळगावच्या केएलई महाविद्यालयातून बीडीएसचं शिक्षण घेतलं आणि त्या डॉक्टर झाल्या. 2010 मध्ये त्यांचं इंजिनिअर असलेल्या प्रविण यांच्याशी लग्न झालं. प्रविण त्यावेळी आर्यलंडमध्ये नोकरीला होते. सविताही लग्नानंतर आर्यलंड मध्ये स्थायिक झाल्या.

नंतर गर्भवती असताना त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास सुरु झाला. वैद्यकिय अहवालानुसार त्यांना गर्भपात करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी गर्भपाताची परवानगी मागितली. पण आर्यलंडच्या कायद्यानुसार गर्भपात करणं हा गुन्हा होता. त्यामुळं त्यांना परवानगी नाकारण्यात आली. याच आजारपणात 28 ऑक्टोबर 2012 ला सविता यांचा मृत्यू झाला.

सवितांच्या मृत्यूनंतर आयरिश जनता रस्त्यावर उतरली. तसंच इतर देशांमध्येही याबाबत निदर्शनं झाली. शेवटी सरकारला यावर सार्वमत घेणं भाग पडलं. 25 मे रोजी झालेल्या सार्वमतात 66 टक्के जनतेनं गर्भपाताचा कायदा रद्द करण्याची मागणी केली. शेवटी सरकारनं कायदा बदलला. आता नव्या कायद्यानुसार 12 आठवड्यांपर्यंतचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी आयरिश महिलांना देण्यात आली आहे.

Loading...

जुन्या कायद्यानुसार आयरिश महिलेनं गर्भपात केल्यास तिला 14 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. यामुळं 2016 मध्ये तब्बल 3 हजार महिलांनी ब्रिटनमध्ये जाऊन गर्भपात केला होता. आज डॉ. सविता नाहीत. मात्र त्यांच्या जाण्याने आयरिश महिलांना जगण्याची एक नवी उमेद मिळाली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2018 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...