विकास भोसले, प्रतिनिधी
सातारा, 07 डिसेंबर: 'फाईट' या चित्रपटाच्या प्रेस दरम्यान केलेला तोडफोडीचा स्टंट उदयनराजे समर्थकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. चित्रपटाची फुकट प्रसिद्धी व्हावी अशी भाबडी आशा ठेऊन हा स्टंट केल्याची चर्चा साताऱ्यात रंगली परंतु, आता हा स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच हिसका दिला आहे.
'फाईट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान गाडीची तोडफोड आणि फ्लेक्स बोर्ड फाडले होते.
'साताऱ्यात फक्त मीच चालतो' असा हिरो बोलत असलेला डायलॉग काढून टाकण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती. कारण साताऱ्यात फक्त खासदार उदयनराजेच चालतात त्यामुळे तुम्ही चित्रपटामध्ये हा डायलॉग वापरू नका अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती.
पण कार्यकर्त्यांचा हा निव्वळ स्टंट असल्याची साताऱ्यात जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्या निर्मात्यांनी सदर घटनेबाबत कोणताही गुन्हा पण दाखल केला नाही. सातारा पोलिसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही शाहुपुरी पोलिसांनी या घटनेत सुमोटू या कायद्याचा वापर करून स्वतः गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात जे संशयित आहेत त्यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांनी 427,506,143,147,149,37(1) या कलमानुसार गुन्हा नोंद करून त्यातील 5 आरोपींना अटक केली आहे. आणखी 3 आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा