आता थेट लोकांमधून निवडून जाणार सरपंच

आता थेट लोकांमधून निवडून जाणार सरपंच

हा निर्णय येत्या सप्टेबर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना लागू असेल.

  • Share this:

03 जुलै : नगराध्यक्षांप्रमाणेच आता राज्यात सरपंचांची निवडही थेट लोकांमधूनच होणार आहे. म्हणजेच आतापर्यंत सरपंच निवडीत सदस्यांना जे महत्व होतं ते आता कमी होईल. देवेंद्र सरकारच्या ह्या निर्णयानं गावचं राजकारण पुन्हा एकदा बदलणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आगामी होऊ घातलेल्या 8 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना लागू असेल..विरोधकांनी मात्र, थेट सरपंच निवडीच्या निर्णयावर टीका केलीय.

काँग्रेस -राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा थेट निवडीचा पर्याय स्वीकारलाय. थेट नगराध्यक्षपदाच्या फार्म्युल्यामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळालं होतं. कदाचित म्हणूनच देवेंद्र सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा पर्याय पुढे केलाय. या निर्णयामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीतला ग्रामपंचायत सदस्यांचा घोडेबाजार आपोआप थांबणार आहे. एवढंच नाहीतर गावपातळीवरचं राजकारणही पूर्णपणे बदलून जाणार आहे. कारण आता सरपंच हा एका वार्डातून नाहीतर अख्ख्या गावातून निवडून येणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला आता अख्ख्या गावात प्रचार करावा लागणार आहे.

या नव्या निर्णयामुळे सरपंचपदाचे अधिकारही वाढवण्यात आलेत. त्याला गावाचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलाय. अर्थात त्याला मंजुरी मात्र, ग्रामसभेतच मिळणार आहे. नव्या तरतुदीनुसार ग्रामसभेच्या अधिकारातही वाढ करण्यात आलीय.

थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत काही शिक्षणाची नवी अटही घालण्यात आलीय. 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवाराला जर सरपंचपदासाठी उभं राहायचं असेल तर त्याला किमान 7वी पास असणं आवश्यक आहे. 1995पूर्वी जन्मलेल्या उमेदवाराला मात्र, ही शैक्षणिक अट लागू असणार नाहीये.

थेट सरपंच निवडीचे फायदे तोटे काय ?

-सरपंचपदाच्या निवडणुकीतील ग्रामपंचायत सदस्यांचा घोडेबाजार थांबणार

-गावपातळीवर नवं नेतृत्व उदयाला येणार

-सरपंचपदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण गावाचा विचार करावा लागणार

- झेडपी, पंचायत समितीसाठी गावपातळीवरचं तयार नेतृत्व मिळणार

- ग्रामपंचायत सदस्यांचं महत्व काहिसं कमी होणार

- सत्ता एका गटाची तर सरपंच दुसऱ्या गटाचा निवडून आल्यास गावाच्या विकासाला खीळ बसणार ?

- राजकीय पक्ष थेट सरपंचपदाची निवडणूक लढवतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 02:19 PM IST

ताज्या बातम्या