कृपाशंकर-निरूपम यांच्यात जुंपली, काँग्रेसमधलं भांडण चव्हाट्यावर

कृपाशंकर-निरूपम यांच्यात जुंपली, काँग्रेसमधलं भांडण चव्हाट्यावर

संजय निरूपम यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही असं सांगत काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनी निरूपम यांना घरचा अहेर दिलाय.

  • Share this:

मुंबई, ता.10 ऑक्टोबर : मुंबई काँग्रेसमधलं भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. मुंबई आणि उत्तर भारतीयांबद्दल संजय निरूपम यांनी केलेल्या वक्तव्याशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही असं सांगत काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनी निरूपम यांना घरचा अहेर दिलाय. काँग्रेसपक्षाची भूमिका समाजात फूट पाडणारी नाही, निरूपम यांचं मत काँग्रेस नेत्यांना पटणारे नाही असंही ते म्हणाले. 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल' असं संतापजनक वक्तव्य निरुपम यांनी नागपुरमध्ये बोलताना केलं होतं.

संजय निरूपम यांच्या या वक्तव्याचे मुंबईत तीव्र पडसाद उमटलेत. मनसेनं त्यांना भटक्या कुत्र्याची उपमा देत आंदोलन केलं. याचा फायदा घेत कृपाशंकर सिंग यांनी पुन्हा एकदा निरूपम यांच्याविरूद्ध आघाडी उघडलीय. मुंबई काँग्रेसमध्ये निरूपम यांच्याविरूद्ध सर्व गट असं वातावरण निर्माण झालंय. निरूपम आणि कृपाशंकर हे उत्तर भारतीयांचे नेते असले तरी त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही. राहुल गांधींचा विश्वास असल्याने निरूपम यांना हात लावण्याची हिंम्मत अजुन कुणालाही झाली नाही.

मुंबई काँग्रेसमधलं भांडण सध्या विकोपाला गेलं असून सर्व गट निरूपम यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच निरूपम विरोधातल्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्र काँग्रेसप्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन निरूपम हटाओ अशी मागणी केली होती.

 

मिलिंद देवरांचा टोला

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही ट्विट करून संजय निरूपम यांना टोला लगावलाय.  जात पात धर्म, प्रदेश या सगळ्यांच्या वर जाऊन मुंबईचं सर्वांवर सारखच प्रेमआहे आणि हेच काँग्रेसचं धोरण आहे असं ट्विट देवरा यांनी केलंय. देवरा यांचं हे ट्विट म्हणजे संजय निरूपम यांना टोला समजला जातोय.

मुंबई काँग्रेसच्या भांडणाचा इतिहास

मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. मुरली देवरा, गुरूदास कामत यांना मानणारे गट, एकनाथ गायकवाड, कुपाशंकर सिंग, प्रिया दत्त, संजय निरूपम अशा अनेक गटात मुंबई काँग्रेस विभागाली आहे. एकेकाळी ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचं मुंबई काँग्रेसवर एकहाती वर्चस्व होतं. देवरा यांनी तब्बल 22 वर्ष मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास आणि उद्योगपतींशी असलेली जवळीक यामुळं त्यांना कुणी हात लावू शकलं नाही.

1981 ते 2003 असं दोन दशकांपेक्षा जास्त काळ ते या पदावर होते. काँग्रेसला रसदपुरवढा मुंबईतूनच होत असल्याने देवरांचं महत्व कायम राहिलं. नंतर गुरूदास कामत यांच्याकडे पक्षानं मुंबई काँग्रेसची धुरा दिली. त्यावेळी देवरा यांच्या समर्थकांनी कामत यांच्याविरूद्ध आघाडी पुकारली.

नंतर कृपाशंकर सिंग यांच्याकडे धुरा आली. पक्षांतर्गत राजकारणापेक्षा भ्रष्टाचाराचे आणि इतर आरोपांमुळेच कृपाशंकर सिंग यांना जावं लागलं. जर्नादन चांदुरकर हे फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. नंतर फायरब्रॅण्ड नेते संजय निरूपम यांच्याकडे राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सोपवली.

निरूपमांना सर्वांचा विरोध

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले निरूपम हे कधीच पक्षात एकरूप होऊ शकले नाहीत आणि इतर नेत्यांनीही त्यांना कधी आपलसं केलं नाही. याला कारण निरूपम यांची कार्यशैली असल्याचंही बोललं जात. राहुल गांधींचा विश्वास ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही त्यांनी जुळवून घेतलय. निरूपम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं, आंदोलनं केलीत मात्र त्यांची प्रतिमा सर्वसमावेशक कधीच झाली नाही.

केवळ उत्तर भारतीयांचे नेते याच भूमिकेतून त्यांच्याकडे कायम पाहिलं गेलं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम उत्तर भारतीय नेत्यांची वर्णी लावली जाते हा काँग्रेसवर कायम आरोप केला जातो. त्याचं कारण म्हणजे मुंबईत असलेली उत्तर भारतीय मतदारांची संख्या हेच आहे.

फायदा कुणाचा होणार?

त्यामुळं आपली लॉबी आणखी घट्ट करण्याचा संजय निरूपम यांचा कायम प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी इतर सर्व गट मतभेद विसरून एकत्र आले आहेत. काहीही केलं तरी इतर नेते आपल्याला स्वीकारणार नाहीत याची जाणीव संजय निरूपम यांना आहे.

त्यामुळे आपला गट मजबूत करण्याकडे त्यांचा कायम कल असतो. त्यामुळेच त्यांच्यावर एकाधिकारशाही आणि मनमानी करण्याचे आरोप होताहेत. सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका, भाजप, शिवसेनेचं मुंबईत असलेलं मोठं आव्हान असं असताना मुंबई काँग्रेस मात्र भांडणात गुंतलेली आहे. भडक वक्तव्य करून वाद निर्माण करणं हे निरूपम यांच्या फायद्याचच ठरणार असून त्यामुळं उत्तर भारतीयांमधलं त्याचं स्थान आणखी पक्क होण्यास मदत होणार आहे.

चव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 05:38 PM IST

ताज्या बातम्या