..नाहीतर 'तूरडाळीचा तडका, अंग अंग भडका' असा अनुभव येईल - उद्धव ठाकरे

योग्य नियोजन झाले असते, तर सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’निघण्याची आफत आली नसती,उद्धव ठाकरेचा टोला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 10:21 AM IST

..नाहीतर 'तूरडाळीचा तडका, अंग अंग भडका' असा अनुभव येईल - उद्धव ठाकरे

26 एप्रिल : एकीकडे शेती उत्पादकता वाढवण्याच्या गोष्टी सत्ताधारी करीत आहेत आणि दुसरीकडे उत्पादकता वाढूनही तूरडाळ उत्पादकांना जर पडलेले भाव आणि थांबलेल्या खरेदीला तोंड द्यावे लागत असेल तर कसे व्हायचे? खरेदी केंद्रांवर नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची तूरडाळ खरेदी करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला ते चांगलेच झाले. त्यामुळे तूरडाळीचा ‘तडका’ काहीसा शांत होईल. मात्र तो पुन्हा होऊ नये यासाठी ‘बाजारात तुरी आणि…' हे धोरण सरकारला बदलावे लागेल. अन्यथा त्या एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  'सामना'तून करण्यात आले आहे.

खरं तर यंदा तूरडाळ उत्पादन भरघोस झाल्याने शेतकरी खुशीत होता, पण तूरडाळ खरेदीतील गोंधळामुळे त्याची प्रचंड ससेहोलपट झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्याच्यावर आली. या गोष्टीही टाळता येण्यासारख्याच होत्या. योग्य नियोजन झाले असते, तर 5 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल दराने 30-35 लाख टन तूरडाळ खरेदी करूनही सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’निघण्याची आफत आली नसती असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्नही असाच शेतकऱ्याच्या मानेभोवती फास बनूनच राहिला आहे. आता भरघोस उत्पादन येऊनही पडलेला भाव आणि खरेदीतील सरकारी गोंधळ या चरकात तूर उत्पादक पिळला जात आहे. 'शेवटचा दाणाही खरेदी करू’ हे आश्वासन पूर्ण केले नाही तर शेतकरी राज्य सरकारवर विश्वास कसा ठेवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

गेल्या वर्षी तूरडाळ उत्पादन कमी झाल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी या पिकाला प्राधान्य दिलं. सरकारनेही त्यासाठी उत्तेजन दिलं आणि निसर्गानेही शेतकऱ्याच्या पदरात भरभरून दान टाकले. तरीही त्याची ससेहोलपट होणार असेल तर तूर लावण्याची ‘चूक’ तो कदाचित करणार नाही आणि तूरडाळीच्या दुष्काळाचे व भाववाढीचे संकट उद्या पुन्हा उभं राहील. सरकारने आयात-निर्यातीत पैसा घालवण्यापेक्षा सामान्य शेतकऱ्यांच्या खिशात त्याने कष्टाने पिकवलेल्या पिकांचं हक्काचे ‘देणे’ कसे पडेल याचा विचार करायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 10:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...