#पेनकिलर : सदाभाऊंचे काय होणार...?

आता सदाभाऊ खोत काय करणार किंवा त्यांचे काय होणार असे दोन मुख्य प्रश्न आहेत. सदाभाऊ विधानपरिषदेत भाजपचे सदस्य असल्याने त्यांच्या आमदारकीला धोका नाही, स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही, एकूण रंग पाहता पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल, असे दिसते पण त्यामुळे सदभाऊंची खुर्ची जाईल असेही नाही कारण मुख्यमंत्री त्यांना अभय देतील.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2017 08:40 PM IST

#पेनकिलर : सदाभाऊंचे काय होणार...?

रफिक मुल्ला, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 8 ऑगस्ट : पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत काही दिवस मौन धारण करणार आहेत, राजकीय रणनिती म्हणून त्यांचे सध्याचे मौन जरी बरोबर असले तरी भविष्यात त्यांच्या वाट्याला अधिक कडवा संघर्ष येईल, यात शंका नाही. आधीची शेतकऱ्यांची मुलुख मैदान तोफ अशी प्रतिमा असणाऱ्या आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी नवी ओळख निर्माण झालेल्या सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होणार यात शंका नव्हती, बराच काळ संघटना आणि सदाभाऊ वाद महाराष्ट्राने पहिला, त्या तुलनेत पक्षाने संथ प्रक्रिया करत सदभाऊंसारखा सेनापती बाजूला केला. मित्र म्हणून केलेल्या आर्थिक मदतीपासूनच्या अनेक आतल्या गोष्टी सार्वजनिक करत 'फ्रेंडशिप डे'च्या दुसऱ्या दिवशी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची दोस्ती तुटली. काडीमोड घेताना दोन्ही बाजूनी आरोपांचा दर्जा सांभाळण्याचा प्रयत्न झाला मात्र तो पूर्ण यशस्वी झाला नाही.

आता सदाभाऊ खोत काय करणार किंवा त्यांचे काय होणार असे दोन मुख्य प्रश्न आहेत. सदाभाऊ विधानपरिषदेत भाजपचे सदस्य असल्याने त्यांच्या आमदारकीला धोका नाही, स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही, एकूण रंग पाहता पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल, असे दिसते पण त्यामुळे सदभाऊंची खुर्ची जाईल असेही नाही कारण मुख्यमंत्री त्यांना अभय देतील. या जोरावरच सदाभाऊ खोत यांनी आपली जुनी संघटना सोडून दिली होती, त्यांना पक्षाने नंतर बाहेर काढले. त्याआधी त्यांनी संघटना सोडली होती, त्यांच्या मुलानेही भाजपात प्रवेश केल्यात जमा आहे.

सदाभाऊ भाजपात जातील अशी दाट शक्यता आहे, मात्र त्यांची कर्मभूमी ही पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यातही प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ते नेते आहेत. त्यामुळे भाजपात जाऊन त्यांचा संघर्ष अधिक अवघड होईल. त्यामुळे नवी शेतकरी संघटना काढून आपले वेगळे अस्तित्व ठेवायचे पण त्याच वेळी भाजपशीही संगत ठेवायची, असा त्यांचा भविष्यातील राजकीय हिशोब असू शकतो. ते वेगळी शेतकरी संघटना स्थापन करणार आहेत, ही माहिती राजकीय वर्तुळात आहेच, संघटनेचे नाव काय असावे याबाबत चर्चा सुरु आहे. सत्ता असते तेव्हा लोक आसपास असतात, ते स्वाभाविक आहे पण जेव्हा सत्ता नसते तेव्हा लोक आजूबाजूला फिरकतही नाहीत. हा सर्वांचा अनुभव पाहता सत्ता असेपर्यंत किंवा सदाभाऊ सत्तेत असेपर्यत निवांत आणि निर्धास्त असतील त्यानंतर मात्र त्यांचा संघर्ष अवघड असेल कारण त्यांना तो एकट्याने करायचा आहे.

जोडीला सत्ता काळात झालेल्या चुका किंवा लोक आणि शेतकरी कार्यकर्त्यांशी स्वाभाविक तसेच कार्यपद्धतीमुळे आलेला दुरावा, तटस्थता हा सुद्धा मोठा अडसर असणार आहे, कारण यामुळे आलेली नकारात्मकता वारंवार समोर येणार आहे. त्या संघर्षात देवेंद्र फडणवीस सोबतीला असतील का ? हा सुद्धा एक मुद्दा आहे, भाजपचे अच्छे दिन राहिले, आणि त्यात मुख्यमंत्र्यांचे अच्छे दिन राहिले तर आणि तोपर्यंत सदभाऊंची वाटचाल तुलनेत सोपी राहील नंतर राजू शेट्टी सारख्या कसलेल्या शेतकरी नेत्यांशी दोन हात करताना सदाभाऊंची निश्चितपणे दमछाक होईल कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनात सदभाऊंना खलनायक बनवण्यात आणि ठरवण्यात त्यांचे आधीचे तसेच आताचे नवे विरोधक यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षात आपले प्रतिनिधी असतानाही सरकारमध्ये राहून सरकारची बाजू उचलून धरण्याचा मोठा आरोप सदाभाऊवर आहे, आणि शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कुणाही नेत्यावर सत्ताधाऱ्यांचे एजंट असा आरोप आल्यावर त्यांचे पुन्हा उभे राहणे अवघड झाले आहे, हा इतिहास आहे. पाहुयात सदाभाऊ तरी हा इतिहास बदलतात का ते ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...