नागपूर,ता. 17 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या पुतळ्याच्या उंची वरून भाजप, काँग्रेस आमने-सामने उभे ठाकले आहेत. विधानभवनामध्ये या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रस्तावित पुतळ्याची उंची कमी करण्यावरुन विधानसभेत गदारोळ झाला. शिवरायांच्या पुतळ्याची उंची 7 फूट कमी करण्यात आली याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण अतुल भातखळकर यांनी या मुद्द्याला हरकत घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं. सभागृहाचं कामकाज बाजूला ठेवून या मुद्यावर चर्चा करा, 15 वर्षात काय केलं ? असे प्रश्न उपस्थित करून या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरु केला. 15 वर्षांत महाराजांचा पुतळा का नाही केला, मी सर्व परवानग्या आणल्या, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. या गदारोळातच काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळवून नेला.
स्मारकाच्या सर्व टप्प्यांच्या कामांना मंजुरी युती सरकारने केंद्राकडून मिळवली. या स्मारकाचा पहिला आराखडा जेजे स्कूल ऑफ आर्टने तयार केला होता. त्यात नंतर अनेक बदल झाले. तुमच्या काळात जे पुतळे झाले त्यांचे चबुतरे किती फूट आणि महापुरुषांच्या पुतळ्याची उंची किती ठेवली हेही जाहीर करतो असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं.
जगातला सर्वात मोठा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच असेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधकांना ते करता आले नाही म्हणून त्याचं पोट दुखतंय असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावाला. या सगळ्या गोंधळामुळे सभागृहचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
हेही वाचा...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा