S M L

अकलूजचा 'सिंह' भाजपच्या जाळ्यात, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे.

Updated On: Mar 20, 2019 01:42 PM IST

अकलूजचा 'सिंह' भाजपच्या जाळ्यात, रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. त्याचवेळी रणजितसिंह यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. तर रणजितने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे, असं विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेली अनेक दिवस होती. मात्र या प्रवेशावर अंतिम मोहोर उमटली ती मंगळवारी 19 मार्च रोजी झालेल्या मोहिते पाटीलांच्या कार्यकर्ता मेळाव्यात.


रणजितसिंह माढ्यातून भाजपचे उमेदवार?

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढ्यातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे. माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे.

लोकसभा 2019 च्या आखाड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातल्या 'चाणक्य नीती'साठी ओळखले जाणारे शरद पवार उतरले होते. पण आता पवारांनी आपली भूमिका बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे.

Loading...

माढा लोकसभा मतदारसंघात कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

करमाळा

माढा

सांगोले

माळशिरस

फलटण

माण

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदासंघांपैकी 3 राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेकडे प्रत्येक 1 मतदारसंघ आहे. त्यामुळे माढ्याची ही जागा राष्ट्रवादीसाठी तुलनेनं सोपी मानली जाते. 2009 साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.

मागच्या दोन निवडणुकांत काय होती स्थिती?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल सव्वा तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. तेव्हाही भाजपकडून त्यांच्याविरोधात सुभाष देशमुख हे मैदानात होते.

कुणाला किती मते मिळाली?

शरद पवार - 530,596

सुभाष देशमुख - 216,137

महादेव जानकर - 98,946

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी थेट निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढवत होते. मोदी लाटेचं मोठं आव्हान असतानाही या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 'विजय' खेचून आणला होता. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी दिलेली कडवी झुंजही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती.

कुणाला किती मते मिळाली?

विजयसिंह मोहिते पाटील - 489,989

सदाभाऊ खोत - 464,645

प्रतापसिंह मोहिते पाटील - 25,187

मतदार संख्या आणि स्वरूप

या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या 17 लाख 27 हजार 322 एवढी होती. यातील 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

पुरूष मतदारांचं प्रमाण : 52.84 टक्के

स्त्री मतदारांचं प्रमाण : 47.16 टक्के

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न

पाणी आणि रस्ते हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागाला कायमच दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. यंदाही हा भाग भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनावरे आणि शेतीसाठीच्या पाण्याशिवायच अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यांची स्थितीही बिकट असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याच प्रश्नांवर रान पेटण्याची शक्यता आहे.


VIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 01:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close