News18 Lokmat

राज्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक', नाशिकमध्ये गोदावरीला पूर !

15 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचं आगमन झालंय. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 04:42 PM IST

राज्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक', नाशिकमध्ये गोदावरीला पूर !

14 जुलै: 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचं आगमन झालंय. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. नाशिकमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाल्यामुळे शहरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालीये.

मराठवाड्यातही वरुणराजाचं जोरदार कमबॅक झालंय. नांदेड, बीड, परभणीतही पावसाचा जोर कायम आहे. भुसावळमध्येही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय. तर कोकणात रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस कोसळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

बोर्डवे ते कसाल दरम्यान, रेल्वे ट्रॅकवर दरडीची माती येऊन पडल्याने रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागली होती. माती हटवल्यानंतर दोन तासाने कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झालीय. मुंबई आणि उपनगरातही काल संध्याकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. कल्याण आणि डोंबिवलीतही मुसळधार पाऊस पडतोय.

अहमदनगर जिल्ह्यातही पुनरागमन झालं आहे. संगमनेर, अकोले, श्रीरामपुर, राहाता, कोपरगाव, राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाला रात्रीपासूनच सुरूवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

खरीपाच्या पिकांना पावसाची अत्यंत गरज असल्याने हा पाऊस पिकांना जिवदान देणारा ठरणार आहे. मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळतोय भंडारदरा परिसरात तर शेकडो धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. शेतकऱ्यांनीही भात शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...