S M L

राहुलच्या हाताचे दोन तुकडे झाले होते, पण...

दिवाळी ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाही तर खरा आनंद हा इतरांच्या आयुष्यात दिवा प्रज्वलीत करण्यात असतो हेच खरं..

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2018 08:45 AM IST

राहुलच्या हाताचे दोन तुकडे झाले होते, पण...

प्रशांत बाग,प्रतिनिधी


नाशिक, 4 नोव्हेंबर : अगदी तोंडावर आलेल्या दिवाळीची लगबग... तातडीनं काम पूर्ण करून घरी जाण्याची तयारी... अवघ्या 11 महिन्याच्या लहानग्याला कपडे घ्यायचे... आईसाठी नववारी तर बायकोला सहावारी साडी घ्यायची... आता 4 दिवस कामावर नाही जायचं... घरच्यांबरोबर दिवाळी करायची... असे अनेक विचार डोक्यात असलेला राहुल हातातलं काम संपवायच्या मागं लागला होता... मात्र,कामावर एक घटना घडली आणि दिवाळीचा दिवा डोक्यात असलेल्या राहुलच्या आयुष्यात अगदी गडद अंधार झाला...अगदी आयुष्यच संपलं..कुटुंबात एकटाच कमावता असलेला राहुल आपल्या उमेदीच्या वयात चक्क उद्ध्वस्त झाला. मात्र,काही लोक नशीबवान असतात. देवाला त्यांची जाणीव असते. पाहता पाहता काही डॉक्टर एकत्र झाले आणि अखेरची घटका मोजणाऱ्या राहुलला वाचवण्यासाठी धडपड करू लागले.


Loading...


स्वतःची दिवाळी बाजूला ठेऊन,राहुलची दिवाळी चांगली जाण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आलं. राहुल वाचला. मात्र,असं काय घडलं होतं राहुलच्या आयुष्यात ? असं मोठं काय काम या डॉक्टरांनी केलं ? हा सगळाच प्रवास अद्भूत असाच होता.


राहुल उगले... अवघ्या पंचविशीतला हा कोपरगावचा युवक... पेपर कटिंग करणाऱ्या राहुलची घरी जायची लगबग सुरू होती. वीज गेलेल्या पेपर कटिंग मशीनची सफाई करतांना, सप्लाय बटन सुरू असल्याचं कोणाच्याच लक्षात नव्हतं. अचानक वीजपुरवठा सुरू झाला,मशीनचं तीक्ष्ण पातं झपकन खाली आलं. आणि काही समजायच्या आतच पेपर ऐवजी राहुलच्या हाताचे चक्क दोन तुकडे करून थांबले. जिथे जीव लावून काम केलं,तेच काम जीवावर बेतलं.


बेशुद्ध राहुलच्या या जखमेतून वेगानं रक्त वाहायला लागलं. काहीच उमजत नसलेल्या राहुलच्या सहकाऱ्यांनी त्याला डॉ जपे यांच्या दवाखान्यात नेलं. तातडीनं सूत्र हलली आणि तुटलेला पंजा घेऊन राहुलला नाशिकला रवाना केलं.


राहुलला आवश्यकता होती ती नाशिकच्या कुशल सर्जन डॉ राजेंद्र नेहेते यांची... दिवाळीच्या सुट्टीवर निघालेले डॉ नेहेते,डॉ पत्नी अनिता नेहेतेसह थेट पोहचले हॉस्पिटलमध्ये... सहकारी डॉ.हर्षद आढाव,डॉ. योगिता भामरेही थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पोहचले. आणि सुरू झालं एक थरारक ऑपरेशन... या चौघाही डॉक्टरांनी आपलो दिवाळी सुट्टी बाजूला ठेऊन,राहुलच्या आयुष्यात दिवा पेटवण्यासाठी सलग 6 तास झुंज केली. त्यांना यश आलं,आणि राहुलचा हा अक्षरशः तुटलेला पंजा त्यांनी नुसताच जोडला नाही तर तो पुन्हा एकदा जिवंत केला.


दिवाळी ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाही तर खरा आनंद हा इतरांच्या आयुष्यात दिवा प्रज्वलीत करण्यात असतो हेच खरं..


=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 11:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close