Elec-widget

कृषीकन्येच्या वडिलांसह चौघांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आंदोलन तुर्तास मागे

कृषीकन्येच्या वडिलांसह चौघांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आंदोलन तुर्तास मागे

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दोन्ही मुलींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

पुणतांबा, 09 फेब्रुवारी : 'देता की जाता' असा नारा देत शेतकऱ्यांच्या लेकींनी गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. मात्र, 6 व्या दिवशी पोलिसांनी बळाचा वापर करत तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच या मुलींचे वडील आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुर्तास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर या मुलींनी आंदोलन मागे घेतले आहे.

कर्जमाफी, मोफत विज, शेतीमालाला हमीभाव इतर मागण्यासाठी 2 फेब्रुवारीपासून पुणतांब्यात शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव या तिघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. 4 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे शुभांगी जाधव या तरुणीला रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, रुग्णालयातही तिचे आंदोलन सुरू होते. पाचव्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तरुणींशी फोनवर संवाद साधून तब्येतीची विचारपूस केली होती. शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर या मुलींची आज सकाळी भेट घेणार होते. परंतु, त्याआधीच पहाटे 3 वाजेच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचून दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आंदोलनाचे सभा मंडपही तोडून टाकले होते. या तरुणींची प्रकृती खालावली असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले, असं पोलिसांनी सांगितलं.

चार जणांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पहाटे 3 वाजता मुलींना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मुलींच्या वडिलांसह कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय जाधव, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी आणि गजेंद्र जाधव यांना ताब्यात घेतले होते. त्यांना राहाता कोर्टात दुपारी हजर करण्यात आले होते. कोर्टाने 18 फेब्रुवारीपर्यंत या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Loading...

पुणतांब्याचा गावकऱ्यांकडून बंद आणि रास्ता रोको

दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर गावकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला. गावकऱ्यांनी गाव बंद केलं आणि रास्ता रोको आंदोलनही केलं.

अखेर उपोषण मागे

दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दोन्ही मुलींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे. येत्या 2 दिवसांत सकारात्क चर्चा न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही आंदोलक मुलींनी दिला.

========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...