पुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले

पुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले

न्यायाधीशाच्या पतीला वेगळा कायदा आहे का अशी चर्चा ही या निमित्ताने पोलीस दलात सुरू होती.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

16 आॅगस्ट : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एका न्यायधीशाच्या पतीने भरचौकात पोलिसाच्या कानशिलात लगावली. आता पोलिसावर हात उचलला तर पोलीस सहज सोडणार नाही. पण इथं घडलं उलटचं, माझी पत्नी न्यायाधीश आहे असं ज्यावेळी समोर आलं. मग काय गुन्हा तर दूरच उलट पोलिसाच्या कानशिलात लगावणाऱ्या पतीची मुक्तता करण्यात आली.

घडलेली हकीकत अशी की, आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास कर्वे रोडच्या नळस्टॉपवर सिग्नल तोडून दुचाकीवर पुढे निघालेल्या वडील आणि मुलीला तिथेच कार्यरत असलेल्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रवी इंगळे यांनी त्यांना हटकल त्यावर पुढे गेलेले  श्याम भदाणे हे पुन्हा चुकीच्या बाजूने मागे आले. दरम्यान, त्यांनी आणि त्यांच्या मुलीने इंगळे यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली.

इंगळे यांनी त्यांच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली दरम्यान भदाणे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची झाली आणि भदाणे यांनी थेट दुचाकी इंगळे यांच्या पायावर घातली. भडकलेल्या इंगळे यांनी भदाणे यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान भदाणे यांच्या मुलीने पोलीस इंगळे यांच्या कानशिलात लगावली, त्यानंतर भदाणे यांनीही गाडीहून उतरून इंगळे यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार बघत असलेल्या दुसर्या कर्मचाऱ्यांनी मधस्थी करत ही मारहाण थांबवली मात्र तिथेच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्ड झालाय. यानंतर भदाणे आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं यासगळ्या प्रवासादरम्यान भदाणे हे आपली पत्नी न्यायाधीश असून कारवाईने काही फरक पडणार नाही अस सांगत होता.

डेक्कन पोलिसांनी ही गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू केल्याचं दुपारी सांगितलं, वाहतूक उपायुक्त यांनी काहीही झालं तरी गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करणार असल्याचं ठासून सांगणारे अधिकारी अचानक काही बोलेनासे झाले. पोलीस सहाय्यक आयुक्त ही पोलीस स्टेशनला येऊन बसल्या होत्या. अखेर अचानक वाहतूक उपायुक्तांचा फोन येतो आणि चार तास सुरू असलेली गुन्हा दाखल करायची प्रक्रिया थांबते. सगळा मामला मिटवून आरोपी आणि फिर्यादी कुठलाच गुन्हा दाखल न करता किंवा कारवाई न होताच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. त्यामुळे वाहतूक उपायुक्तांनी नेमकं असं काय सांगितलं. ते न्यायाधीशाचे पती असल्याच्या दबावाला बळी पडले का असा प्रश्न उपस्थित होतो. महत्वाचं म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्यासोबत रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल राहिल असेल का असाही प्रश्न आहे..

न्यायाधीशाच्या पतीला वेगळा कायदा आहे का अशी चर्चा ही या निमित्ताने पोलीस दलात सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 09:58 PM IST

ताज्या बातम्या