News18 Lokmat

भाजप प्रवेशाच्या मुद्यावर काय म्हणाले प्रतिक पाटील?

वसंतदादा घराणे भाजपमध्ये जाऊच शकत नाही आणि दादा घराण्याचा फायदा भाजपला होऊ देणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 03:40 PM IST

भाजप प्रवेशाच्या मुद्यावर काय म्हणाले प्रतिक पाटील?

असिफ मुरसल, सांगली 21 मार्च : वसंतदादा घराणे हे काँग्रेस मधेच राहणार आहे. त्यांचे सदस्य  भाजपमध्ये कधीच जाणार नाहीत असं स्पष्टिकरण प्रतिक पाटील यांनी दिलंय. पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

पाटील म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षातून सुरुवात केली आणि काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यामध्ये बळकटीकरण केले. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षात आजपर्यंत आहोत. मात्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आमची जवळीक आहे आणि त्यांची ही दादा घराण्यासोबत जवळीक आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जाण्याची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे वसंतदादांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सांगलीतील काँग्रेस नेते प्रतीक पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे प्रतीक पाटील यांची भेट झाली आहे. मात्र ही भेट राजकीय कारणासाठी झाली नसल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील यांनी मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading...

काँग्रेसला पहिला धक्का

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या भाजपप्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते देखील उपस्थित होते.

सुजय विखे आणि लोकसभा उमेदवारी

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी आणि वाजल्यानंतरही सर्वच पक्षात आयाराम आणि गयारामांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशातच सुजय विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

परंतु, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पवारांनी नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.यावर कोणताच निर्णय निघत नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात, भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठकही झाली होती आणि अखेर 12 मार्चला सुजय विखे पाटलांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...