News18 Lokmat

ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार?

आधीच दुरावत चाललेला मुस्लीम आणि दलित मतदार ओवेसी आणि आंबेडकर एकत्र आल्याने आपल्यापासून आणखी दुरावणार का याची भीती काँग्रेसला वाटत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 05:50 PM IST

ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी काँग्रेसचा खेळ बिघडवणार?

मुंबई,ता. 19 सप्टेंबर : भाजप विरोधात काँग्रेस महाआघाडी उभारण्याचा प्रयत्न करतेय. असं असतानाच महाराष्ट्रात एमआयएम म्हणजेच 'ऑल इंडिया मजलीस ए मुसलमीन' आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने आघाडी करण्याची घोषणा केलीय. या आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चिंता वाढल्या आहेत. जातींची समिकरणं बघता काँग्रेसने लगेच प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रणही दिल आहे. मात्र या निमंत्रणाला प्रकाश आंबेडकरांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रकाश आंबेडकरांनी 'वंचित बहुजन आघाडी' तयार केली होती. त्यात एमआयएम सामील झाला आणि आता संभाजी ब्रिगेडही सामील होणार असा दावा केला जातोय. 2 ऑक्टोबरला औरंगाबदमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचा जोर वाढतोय?

गेल्या काही वर्षात एमआयएमचा महाराष्ट्रात मुस्लिम बहुल भागात प्रभाव वाढतो आहे. याच बळावर पक्षाचे मागच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आलेत. तर औरंगाबाद महापालिकेत सध्या एमआयएमचे 24 सदस्य आहेत. आक्रमक भाषा आणि एकाच समाजापुरतं राजकारण यामुळं एमआयएमवर कायम टीका होते असते. एमआयएम विखारी राजकारण करतं असही आरोप होत असतो. मात्र असं असलं तरी मुस्लीम तरूणांमध्ये एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं आकर्षण आहे.

प्रकाश आंबेडकरांचा 'आवाज' वाढला

1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांनी विविध पक्षांची मोट बांधून तयार केलेला भारिप-बहुजन महासंघाचा 'अकोला पॅटर्न' महाराष्ट्रात चांगलाच गाजला. नंतर अमरावती आणि किनवट मध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं. पण हे फक्त प्रयोगच राहिले पुढे राजकारणावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि प्रकाश आंबेडकरांचीही ताकद मर्यादीतच राहिली. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पुकारलेला बंद यशस्वी राहिला. सत्तेत असल्याने रामदास आठवले आक्रमक भूमिका घेऊ शकले नाही. ती जागा आंबेडकरांनी भरून काढत सरकारवर आक्रम टीका करत आपलं स्थान पक्क केलं. त्यामुळं त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली.

Loading...

सरकारविरोधी असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न

2014 नंतर समाजातल्या मुस्लीम आणि दलित घटकांमध्ये असंतोष आहे. रोहित वेमुला प्रकरण, मॉब लिंचिंग, गोहत्याबंदी प्रकरण, बीफ बॅन या घटनांमुळे निर्माण झालेला असंतोष आपल्या बाजूनं वळवण्याचा ओवेसी आणि आंबेडकरांचा हा प्रयत्न आहे. गुजरातमध्ये जिग्नेश मेवानी यांनी हा प्रयोग यशस्वी केला त्यामुळे महाराष्ट्रातही अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ही आघाडी म्हणजे तोच प्रयत्न असल्याचा अंदाच राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केला.

काँग्रेसचा हक्काचा मतदार दुरावणार?

मुस्लीम आणि दलित हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार समजला जातो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र हे सर्वच समज-गैरसमज आणि 'व्होट बँका' उद्धवस्त झाल्या. नवी समिकरणं तयार झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. असं असलं तरी काँग्रेसची मुस्लीम आणि दलित मतांवरची भीस्त कमी झालेली नाही. आधीच दुरावत चाललेला मुस्लीम आणि दलित मतदार ओवेसी आणि आंबेडकर एकत्र आल्याने आपल्यापासून आणखी दुरावणार का याची भीती काँग्रेसला वाटते आहे.

फक्त दबाव वाढवण्याचा प्रयत्न?

एमआयएम, प्रकाश आंबेडकर आणि त्यात संभाजी ब्रिगेड जरी सहभागी झाला तरी त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही असंही मत व्यक्त केलं जातंय. कारण काही भागांपुरताच या नेत्यांचा प्रभाव आहे. जिंकून येवू शकलो नाही तरी मतं फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आपलं उपद्रवमूल्य दाखवून राजकारणातली बार्गेनिंग पॉवर वाढवून घेण्याचा हा प्रयत्न आहे का? असाही सवाल विचारला जातोय.

काँग्रेस महाआघाडी उभारण्याचा प्रयत्न करत असतना महाराष्ट्रात ही आघाडी झाली तर त्यामुळं काँग्रेसचा राजकीय खेळ बिघडण्याची शक्यता जास्त आहे. ओवेसी जेवढं जास्त आक्रमक बोलतील तेवढं मतांचं ध्रुविकरण जास्त होऊन त्याचा फायदा भाजप होतो असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांच्यावर होत असतो.

तर प्रकाश आंबेडकरही अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत करतात असाही आरोप होत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर या नव्या आघाडीमुळं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चिंता वाढणार आहे.

VIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळले पैसे!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...