प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा फटका कुणाला ?

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत जाणार नाही, असं जाहीर करून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. पण त्यांच्या स्वतंत्र लढ्याचा भाजपलाही तोटा होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 07:50 PM IST

प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा फटका कुणाला ?

मुंबई, 12 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत जाणार नाही, असं जाहीर करून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. राज्यातल्या सगळ्या 48 जागांवर आपण स्वतंत्र उमेदवार लढवू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. पण त्यांच्या स्वतंत्र लढ्याचा भाजपलाही तोटा होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

प्रकाश आंबेडकर हे स्वत: सोलापूरमधून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सोलापूर हा बालेकिल्ला असलेल्या सुशीलकुमार शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार का याबदद्ल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. स्वत: प्रकाश आंबेडकरही आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नव्हते. त्यामुळे त्यांच्या आघाडीतले कार्यकर्ते आणि समर्थक नेमके कुणाच्या बाजूने आहेत याबद्दलही त्यांची नेमकी भूमिका कळत नव्हती. पण आता मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

गर्दी होते पण मतं मिळणार का ?

प्रकाश आंबेडकरांच्या सभांना प्रचंड गर्दी होते.या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होईल का हाही प्रश्न विचारला जातोय.त्यांच्या भारिप बहुजन महासंघाने MIM सह आणखी घटकपक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. MIM मुळे मुस्लीम मतदारांची मतं या आघाडीला मिळतील. याचा फटका काँग्रेसला शहरी भागात बसू शकतो.

Loading...

मुस्लीम आणि ओबीसी मतांची मोट बांधत बहुजन वंचित आघाडीला यशस्वी करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा विचार आहे. त्यांना माळी आणि धनगर समाजातल्या नव्या नेतृत्वाचाही पाठिंबा आहे. या समुदायाची मतं प्रकाश आंबेडकरांच्या कडे गेली तर काँग्रेसला तोटा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

धनगर समाजाची मतं कुणाला ?

वंचित बहुजन आघाडीची सुरुवात पंढरपूरमधल्या मेळाव्यात धनगर समाजातल्या नेत्यांनी केली, असं प्रकाश आंबेडकर यांनी News 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत सांगितलं. 2014 च्या निवडणुकीत धनगर समाजाने भाजपला मतं दिली पण यावेळी धनगर समाजातलं नवं नेतृत्व आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमच्या आघाडीचा भाजपलाही तोटा होईल, असा दावा त्यांनी केला.

धनगर आरक्षणाची कागदपत्र गायब, सरकारी वकिलांची धक्कादायक माहिती

यापूर्वी प्रकाश आंबेडकर हे समाजवादी पक्षासोबत होते. पण त्यांच्याकडून भ्रमनिरास झाल्यामुळे यावेळी त्यांनी MIM सोबत जाण्याचा निर्णय घेतला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या लोकशाही आघाडी सरकारमध्येही भारिप बहुजन महासंघाचे 2 मंत्री होते.

आता मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची साथ पूर्णपणे सोडली आहे. एवढंच नव्हे तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन त्यांनी काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

बसपाही काँग्रेससोबत नाही

दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातही बहुजन समाज पक्ष काँग्रेससोबत असणार नाही. त्यामुळे काँग्रेसला दलित आणि मुस्लीम मतांच्या बाबतीत तोटा सहन करावा लागणार आहे.

बसप आणि बहुजन वंचित आघाडी सोबत नसल्यामुळे मुंबई आणि नागपूरमध्ये काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं.

प्रकाश आंबेडकरांच्या नव्या घोषणेमुळे दलित आणि मुस्लीम मतांचं गणित महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

==================================================================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...