पालघरचा खेळ : काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप नेहमीच तिकीट मिळवतो 'हा' उमेदवार

पालघरचा खेळ : काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप नेहमीच तिकीट मिळवतो 'हा' उमेदवार

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीपासून या उमेदवाराने 3 वेळा पक्ष बदलला. अगदी ऐन वेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण याच उमेदवारामुळे इतके दिवस अडलेला युतीचा पालघर पेच सोडवला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीपासून या उमेदवाराने 3 वेळा पक्ष बदलला. अगदी ऐन वेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांचा इतिहास आहे. पण याच उमेदवारामुळे इतके दिवस अडलेला युतीचा पालघर पेच सोडवला आहे. हा उमेदवार आहे राजेंद्र गावित.

2014 ते 2019 दरम्यान गावित यांनी काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास करत लोकसभेचं तिकीट मिळवलं. काँग्रेस, भाजप अशा वाटेने अखेर गावित शिवसेनेत प्रवेश करते झाले आणि लगेचच त्यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सर्व पक्षांना हवेसे वाटणारे राजेंद्र गावित नेमके आहेत कोण आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालायला सगळे कसे उत्सुक आहेत?

पालघरचा इतिहास

पालघर लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात कुठल्याही पक्षाकडे हमखास जिंकणारा उमेदवार कधीच नव्हता. चिंतामण वनगा यांचं इथे वर्चस्व होतं. ते भाजपचे सदस्य होते. 2014च्या निवडणुकीत पालघर मतदारसंघ भाजपने जिंकला. वनगा खासदार झाले. त्यांच्याविरोधात उभे होते हेच राजेंद्र गावित, जे त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार होते. पण 2018च्या सुरुवातीला चिंतामण वनगा यांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं आणि पालघरसाठी पोटनिवडणूक घ्यायची वेळ आली.

गेल्या वर्षी मेमध्ये झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी सेना-भाजप यांचे संबंध ताणलेले होते. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याच्या पवित्र्यात असतानाच चिंतामण वनगांचा मुलाला सेनेनं तिकिट देऊ केलं. अशा प्रकारे श्रीनिवास वनगा भाजपऐवजी शिवसेनेत दाखल झाले आणि भाजपची आयत्या वेळी उमेदवारासाठी शोधाशोध सुरू झाली. पालघर भागात वनगांनंतर चर्चा होती राजेंद्र गावित या नावाची. काँग्रेसमधून त्यांना फोडण्यात भाजप यशस्वी झाला आणि त्यांचा उमेदवाराचा शोध संपला. राजेंद्र गावित यांनी पोटनिवडणूक झाल्यानंतर अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वनगा विरुद्ध गावित असाच हा सामना झाला आणि तो गावितांनी जिंकला. शिवसेनेकडून लढणारे श्रीनिवास वनगा यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला. तो केला या राजेंद्र गावित यांनी. पण गावित त्या वेळी भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. काँग्रेस पक्ष तेव्हा चौथ्या स्थानावर फेकला गेला होता. राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्या मतांमध्ये फार मोठी तफावत नव्हती.

--------------------------------------------

लोकसभा पोटनिवडणूक 2018

राजेंद्र गावित 2,72,782

श्रीनिवास वनगा 2,43,210

-----------------------------------------------

पालघर मतदारसंघात आणखी एक पक्ष महत्त्वाचा ठरू शकतो आणि तो म्हणजे बहुजन विकास आघाडी. गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत या पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 2 लाख 22 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. या मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 जागांवर सध्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि सीपीआयने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत युती विरुद्ध ही महाआघाडी असा सामना रंगणार आहे.


पालघरमध्ये येणारे विधानसभा मतदासंघ

डहाणू

विक्रमगड

पालघर

बोईसर

नालासोपारा

वसई


चक्र उलटी कशी फिरली

2019 च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि चक्र उलटी फिरली. पालघर मतदारसंघाला महत्त्व आलं कारण गेल्या वर्षीच एकमेकांविरोधात इथे लढलेले दोन पक्ष आता युती करून समोर येण्याचं ठरलं. पालघरची जागा भाजप ठेवणार की शिवसेनेसाठी सोडणार यावरून चर्चा रंगल्या. युतीच्या जागा वाटपाचा 23-25 फॉर्म्युला ठरला. सेनेच्या खात्यात एक जागा वाढली, त्याची चर्चा झाली. पण शेवटपर्यंत ती जागा पालघरची की आणखी कुठली याचा सस्पेन्स कायम राहिला.

अखेर ती जागा सेनेकडेच असल्याचं स्पष्ट झालं आणि उमेदवार कोण यावर खल सुरू झाला. सोमवारी (26 मार्च) 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि पालघरचा युतीचा पेच अखेर सुटला.

श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याची चर्चा झाली. राजेंद्र गावित हे आता पालघरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.

कोण आहेत राजेंद्र गावित?

राजेंद्र गावित मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते. पालघरच्या आदिवासी भागात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. ते मूळचे नंदुरबारचे आहेत. पण कार्यक्षेत्र पालघरच राहिलं आहे. पालघरमधून ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसच्या सरकारमध्ये ते आदिवासी विकास राज्यमंत्रीसुद्धा होते. 2014ची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून ते लढले आणि भाजपच्या चिंतामण वनगा यांनी त्यांना हरवलं. त्याचा वनगांचा मुलगा 2018 च्या पोटनिवडणुकीत त्यांच्याविरोधात उभा होता पण शिवसेनेचा उमेदवार म्हणून. आणि स्वतः गावित ही निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढले. 2014 ते 2019 दरम्यान गावित यांनी काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास करत लोकसभेचं तिकीट मिळवलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या