नाशिक, 19 सप्टेंबर: नाशिक जिल्हयातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी नंतर व्यापाऱ्यांनी बंद केलेला लिलाव आजपासून सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारपासून बंद असलेल्या लासलगाव, नांदगाव बाजार समितीत आज 11 वाजता लिलाव सुरू झाला आहे. लासलगाव बाजार समितीत सुमारे 5 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, पिंपळगाव, येवला,उमराणे यासह सर्वच बाजार समित्यांमध्येही कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या व्यापारी शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. प्रशासनाकडून लिलाव सुरू करण्यासंदर्भात कांदा व्यपाऱ्यांना अलटीमेटम देण्यात आलं होतं. सोमवारी लिलाव सुरू केला नाही तर लायसन्स रद्द केलं जाईल असा ईशारा जिल्हाधिकाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्यांना दिला होता.
या संदर्भात जिल्हाधिकारी कांदा व्यापारी, बाजार समिती सदस्य आणि शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अखेर कांदा व्यापाऱ्यांनी सोमवार पासून लिलाव सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर संपूर्ण जिल्ह्यात हा लिलाव सुरळीतपणे सुरू झालाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा