तब्बल २५ हजार हेडफोन्सवर इथं होतोय सत्संग सोहळा!

तब्बल २५ हजार हेडफोन्सवर इथं होतोय सत्संग सोहळा!

हा आगळावेगळा सत्संग येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनधी


अंबरनाथ, 22 नोव्हेंबर : न्यायालयानं ध्वनी प्रदुषणावरून अनेकदा फटकारल्यानंतरही त्याचं सर्रासपणे उल्लंघन केलं जाताना आपण अनेकदा पाहतो. मात्र उल्हासनगरात सध्या ध्वनीप्रदूषण टाळत एक अनोखा सत्संग सुरू आहे. या सत्संगात भाविक चक्क हेडफोन लावून अध्यात्मात एकरूप होतात.


कानाला हेडफोन लावून तल्लीन झालेले हे सगळेच काही हिंदी चित्रपटातील संगीताचा आनंद लुटतायेत असे तुम्हाला वाटेल. मात्र हे भाविक हेडफोन लावून चक्क सत्संग एकतायेत. जवळपास २० हजार भाविकांची गर्दी, पण सगळे चिडीचूप आणि तल्लीन होऊन गेल्या एक आठवड्यापासून भल्यापहाटे इथं सत्संगातून अध्यात्म ऐकताय.


उल्हासनगरच्या गोल मैदानात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या सत्संगाची वेळ असते पहाटे पावणेचार ते पाच! शिवाय मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग. त्यामुळं इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग केला, तर परिसरातल्या लोकांची झोपमोड होण्याची भीती. शिवाय इतक्या पहाटे सत्संग केल्यानंतर त्यातून होणारं ध्वनीप्रदूषण वेगळंच. त्यामुळं हे सारं टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आलेत.


समोरच्या भव्य स्टेजवर शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन करतात, त्यांना वाद्यांचीही साथ असते. मात्र त्यांचा आवाज स्पीकरकडे न जाता तो जातो थेट भाविकांच्या हेडफोनमध्ये, आणि भाविकही कानात हेडफोन घालून सत्संगात तल्लीन होऊन साथ देतात. या आगळ्यावेगळ्या सत्संगासाठी याठिकाणी वायफाय यंत्रणा उभारण्यात आली असून त्यावर चालणारे २० हजार विशेष हेडफोन्स तयार करून घेण्यात आले आहेत.. इथं आलेले सर्व भाविक हे विशेष हेडफोन घालून सत्संगात सहभागी होतात.


बरं फक्त मंडपातच बसलेल्या भाविकांना नाही, तर जगभरात असलेल्या अमृत वेली परिवाराच्या जवळपास २५ लाख अनुयायी आणि भाविकांना हा सत्संग थेट पाहता येण्याचीही व्यवस्था केली जाते. हे हेडफोन्स घालून सत्संगात सहभागी झाल्यानंतर आधीपेक्षाही अधिक आनंददायी अनुभव येत असल्याचं भाविक सांगतात. शिवाय या निर्णयाचं स्वागत करतानाच न्यायालयाचा सन्मान राखल्याचीही भावना भाविक व्यक्त करतात.


हा आगळावेगळा सत्संग येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुरू गोविंद सिंह यांचा जन्मसोहळा याठिकाणी होणार असून या सोहळ्याला जवळपास १ लाख भाविक हजेरी लावतील, असं अंदाज आहे.


मात्र इतकी प्रचंड गर्दी होऊनही इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. त्यामुळं अमृत्वेली परिवाराची शिस्त आणि त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लढवण्यात आलेली ही अनोखी शक्कल, यांचं कौतुकच करावं लागेल.


=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 02:17 PM IST

ताज्या बातम्या