जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना ओलांडावा लागतो नाला, पस्तीस वर्षांचा जीवघेणा प्रवास

जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना ओलांडावा लागतो नाला, पस्तीस वर्षांचा जीवघेणा प्रवास

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या बामणी गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. पण गेल्या 35 वर्षांत त्यांना फक्त आश्वासनच मिळालीत.

  • Share this:

मुजिब शेख, नांदेड, ता. 20 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या बामणी गावातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. गावाजवळून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर पूल बांधून द्यावा अशी मागणी हे गावकरी गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत. मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही. या नाल्यावर पूल झाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गवकऱ्यांनी दिला आहे.

बामणी या गावातून मेंढला नाला जातो. नदीसारखे मोठे पात्र असलेल्या या नाल्यात सध्या मोठया प्रमाणावर पाणी असते. याच नाल्याच्या पलीकडे बामणी मधील तब्बल सत्तर टक्के शेतकऱ्यांची शेती आहे. नाल्यावर पूल नसल्याने आपल्या शेतात जाण्यासाठी बामणीच्या ग्रामस्थांना दररोज गळ्यापर्यंत पाणी असलेला हा नाला ओलांडून दुसऱ्या तीरावर जावं लागतं. महिला, मुलं आणि गुरा ढोरांनाही असा प्रवास करावा लागतो. हे दुष्ट चक्र केव्हा संपणार असा सवाल इथल्या नागरिकांचा आहे.

या नाल्यावर कोल्हापूरी बंधारा बांधून द्यावा अशी मागणी बामणीचे नागरिक गेल्या 35 वर्षांपासून करत आहेत. मात्र आश्वासन देण्यापलीकडे नेत्यांनी काहीही केलं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आत्तापर्यंत किमान 15-16 वेळा इथल्या पुलासाठी नारळ फोडण्यात आले. निवडणुका आल्या की फक्त नेते येतात आणि आश्वासनांची खैरात करतात पुढे मात्र काहीच होत नाही असा आरोप संतोष सूर्यवंशी या शेतकऱ्याने केला आहे.

पावसाळ्यात या नाल्याला भरपूर पाणी असतं आणि तोच काळ पेरणीचाही काळ असतो त्यामुळे हा नाला ओलांडताना प्रचंड वेळ आणि शक्ती खर्च होते. महिला आणि मुलांची होणारी परवड शब्दात सांगता येत नाही अशी संताप गावकऱ्यांनी व्यक्त केली.

शासनाकडे अनेकदा प्रस्ताव पाठवूनही काहीच काम झालेलं नाही. परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा बामणीचे सरपंच संतोष कदम यांनी दिला आहे.

VIDEO :  परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 09:06 AM IST

ताज्या बातम्या