News18 Lokmat

आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन, सैफी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत सैफी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला. आमदार डोळस यांच्या पार्थिवावर उद्या (१ मे) सकाळी 10 वाजता दसूर (ता. माळशिरस) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 03:22 PM IST

आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन, सैफी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई, ३० एप्रिल- माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत सैफी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला.  मृत्यू समयी त्यांचे वय ५८ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा संकल्प, मुलगी सिध्दी व पत्नी कांचन असा परिवार आहे. आमदार डोळस यांच्या पार्थिवावर उद्या (१ मे) सकाळी 10 वाजता दसूर (ता. माळशिरस) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हनुमंत डोळस यांना 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती.

हनुमंतराव डोळस हे विकास कामांविषयी व विधिमंडळ कामकाजाविषयी अत्यंत आस्था असलेले आमदार होते. त्यांच्या निधनाने पक्षाची व माळशिरस तालुक्याची मोठी हानी झाली आहे. डोळस कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली आहे.

'दुःखद बातमी... पक्षाचा , सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार आज आपल्यात नाही.  काल मुंबईत जाऊन हॉस्पिटलला जाऊन भेट घेतली, ते पुन्हा आपल्यासोबत येतील, अशी आशा होती. पण परिस्थिती गंभीर होती. मी आज मंगळवेढा, सोलापूर, उद्या उस्मानाबादला दुष्काळ पाहण्यासाठी जाणार होतो.  मी आतापासून माझे सर्व कार्यक्रम रद्द केलेत.'

-शरद पवार

Loading...

शरद पवार यांनी रद्द केला दुष्काळी दौरा....

आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी दौरा रद्द केला आहे. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथून पवार परत जाणार आहे. पवार यांचा आज सांगोला, मंगळवेढा, सोलापूर आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा होता.

हनुमंत डोळस यांचा परिचय....

- मुळचे दसुर, (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील असणारे हनुमंत डोळस हे शिक्षणाकरीता मुंबई येथे गेले. मुंबईमध्ये  खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी व्यावसायासह राजकारणामध्ये प्रगती केली.

- आमदार डोळस यांचे प्राथमिक शिक्षण (१ ली ते ४ थी) जिल्हा परिषद शाळा दसुर येथे झाले. इ. ५ वी ते ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा तोंडले व ११ वी पर्यंतचे शिक्षण विवेकवर्धिनी विद्यालय, पंढरपूर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबई येथे गेले. - आमदार डोळस हे ४ महिन्यांचे असतानाच त्यांना मातृवियोगाला सामोरे जावे लागले. त्यांच्या आईचे नाव कलावती होते. प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत असतानाच त्यांच्यावर दुसरा आघात झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना ४ बहिणी व १ भाऊ आहे. १९७२ साली विजयसिंह मोहिते-पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कार्यक्रमानिमित्त दसुर येथे गेले होते. त्यावेळी हनुमंत डोळस हे विजयदादांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी विजयदादांवर केलेली कविता त्यांना वाचून दाखवली. कविता आवडल्यानंतर विजयदादांनी त्यांना १० रूपयांचे बक्षिस दिल्याचे डोळस नेहमी सांगत असत. मुंबई येथे बी.कॉमचे शिक्षण घेत असताना विजयदादांनी त्यांना नेहमी सहकार्य केले होते.

-मुंबई येथील हॉटेल सहारामध्ये विजयदादांच्या ओळखीने डोळस यांना नोकरी लागली. हॉटेलमध्ये काम करून हनुमंत डोळस यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. विजयदादांच्या सहकार्याने व स्वत:च्या अंगभुत कौशल्याने डोळस यांनी राजकारणामध्ये आपल्या ओळखी वाढवल्या.

- १९८२ मध्ये ते युवक काँग्रेसचे बोरीवली शाखेचे अध्यक्ष झाले. त्यांची १९८५ मध्ये मुंबई शहर युवक काँग्रेसच्या कार्यकारणीवर निवड झाली. १९९० मध्ये ते म्हाडाचे सदस्य झाले.

- १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  २४ जुन १९९९ साली त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली. याच साली ते संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले.

-  २००९ साली माळशिरस मतदार संघ आरक्षीत झाला. विजयदादांबरोबर असलेले जुने संबंध आणि विश्वासाच्या जोरावर त्यांनी माळशिरस तालुक्याचे आमदारकीचे तिकिट मिळवले. उत्तम जानकर यांचा पराभव करून ते आमदार म्हणून निवडून आले.

- माळशिरस तालुक्यात त्यांनी आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे केली. त्यांच्या कामाचा धडाका पाहुन विजयदादांनी त्यांना सलग दुस-यांदा म्हणजेच २०१४ सालीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा आमदारकीचे तिकिट मिळवून दिले. विरोधी उमेदवार अनंत खंडागळे यांचा ६२४५ मतांनीपराभव करत हनुमंत डोळस दुस-यांचा माळशिरस तालुक्याचे आमदार झाले.

- २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा डोळसच उभे राहतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता.


VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...