राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबेना.. नांदेडच्या जिल्हाध्यक्षाची सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याच नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोरठेकर यांनी सोमवारी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 04:18 PM IST

राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबेना.. नांदेडच्या जिल्हाध्यक्षाची सोडचिठ्ठी

मुजीब शेख, (प्रतिनिधी)

नांदेड, 29 जुलै- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याच नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोरठेकर यांनी सोमवारी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात समर्थकांनी भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांना आग्रह केलाय. तसेच गोरठेकर यांनी विधानसभेसाठी भोकरमधून निवडणूक लढवावी, असाही कार्यकर्त्यांनी आग्रह केलाय. विशेष म्हणजे भोकर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भोकरमध्ये गोरठेकर यांनी लढावे यासाठी समर्थकांनी आग्रह धरलाय.

या घडामोडीमुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. गोरठेकर यांच्यासोबत अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी सोडणार आहेत, त्यामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.

शरद पवारांचा जवळचा नेता भाजपच्या वाटेवर...

नवी मुंबईत सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 57 नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक झाली. महापौर जयवंत सुतार यांनी ही बैठक बोलावली होती. माजी खासदार गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. आणि एकत्रित निर्णय घेऊन गणेश नाईकांवर दबाव टाकला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

संजीव नाईक यांनी इन्स्टाग्राम वर टाकलेली पोस्ट

गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. 'आमचा पक्ष नाईक साहेब, साहेब तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण.', असा संदेश या पोस्टमधून देण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचा भाऊ शिवसेनेत करणार प्रवेश..

विदर्भात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे. कारण पुसद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक हे आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची बंधू आहेत.

मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक मंगळवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. मनोहरराव नाईक हे स्वत: शिवसेना प्रवेशाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांच्या हातावरही शिवबंधन बांधले जाईल. मनोहरराव नाईक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र इंद्रनील नाईक हेच आगामी विधानसभा निवडणुकीचा पुसदमधील चेहरा असतील, अशी चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, 'सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी सुरू आहे. या फोडाफोडीसाठी अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर भाजपकडून होत आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'काही नेते सोडून गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. मी याआधीही अशी परिस्थिती बघितली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याची आम्हाला कल्पना आहे,' असंही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे,' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

VIDEO: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...