News18 Lokmat

अजित पवार सभागृहात भडकतात तेव्हा...

मुख्यमंत्री कुणाला करायचं आणि कुणाला नाही याचा अधिकार या सभागृहाचा आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिलेच पाहिजेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 03:47 PM IST

अजित पवार सभागृहात भडकतात तेव्हा...

मुंबई 26 जून : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बोलण्याची एक खास स्टाईल आहे. दादा कुठलीही भीडभाड न ठेवता सरकारला सुनावत असतात. त्यांच्या या रागाचा फटका अनेक मंत्र्यांना बसला आहे. सभागृहाची प्रतिष्ठा असो की मंत्र्यांचं उत्तर ते जर समाधानकारक नसेल तर दादा पुढे आलेच म्हणून समजा. विरोधी पक्षनेते बोलत असताना सभागृहात एकही कॅबिनेट मंत्री नाही हे दिसताच आज अजित दादांचा पारा चढला. सरकारने काय थट्टा चालवली काय असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं आणि संबंधीत मंत्र्यांना सभागृहात हजर व्हावं लागलं.

सभागृहाचं कामकाज सुरू असताना किमान एकतरी कॅबिनेट मंत्र्याने सभागृहात हजर राहावं अशी प्रथा आहे. ज्या खात्याची प्रश्नोत्तरं सुरू आहेत त्या खात्याच्या मंत्र्याने तर हजर राहिलच पाहिजे असा दंडक आहे. मात्र अनेक कामाच्या व्यस्ततेत किंवा नियोजनाअभावी संबंधीत मंत्री सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत. असे प्रसंग अनेकदा घडत असतात.

आज असाच प्रसंग घडला. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आपला विषय मांडत असताना सभागृहात संबंधीत विभागाचे मंत्री उपस्थित नव्हते. हे लक्षात येताच अजित पावरांचा पारा चढला. ते म्हणाले, जेवढं वरचं सभागृह महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खालचं सभागृह महत्वाचं आहे. मुख्यमंत्री कुणाला करायचं आणि कुणाला नाही याचा अधिकार या सभागृहाचा आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहिलेच पाहिजे असंही त्यांना सरकारला सुनावलं.

दादांच्या या नाराजीनंतर अध्यक्षांनी संबंधीत मंत्र्यांना हजर राहण्यास सांगितलं आणि ते मंत्री थोड्याच वेळात सभागृहात हजर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 02:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...