News18 Lokmat

नगरमधून सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीने दिला 'हा' उमेदवार

नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 07:20 PM IST

नगरमधून सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीने दिला 'हा' उमेदवार

अहमदनगर, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे. दरम्यान, संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहे.

संग्राम जगतापांच्या 'या' खेळीने पवार झाले होते नाराज

नगरच्या महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीच्या मदतीनं महापौरपदी विराजमान झाला होता. विशेष म्हणजे, पक्षनेतृत्त्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली होती.

महापौर निवडीच्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होणार अशी शक्यता होती. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी रणनीती आखली होती. जगताप यांनी घडवून आणलेल्या युतीमुळे भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.

संग्राम जगताप यांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर कारवाई करू, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं.

Loading...

तर जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली होती. अखेर 12 जानेवारी 2019 रोजी 18 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु, संग्राम जगताप यांना अभय देण्यात आला होता.

विखे - पवार यांचा नगरच्या जागेवरून होता वाद

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगला होती. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशावरून आघाडीमध्ये ही बिघाडी झाली होती. सुजय विखे पाटील यांच्यासाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिला होता. तेव्हापासूनच शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातला वाद विकोपाला गेला. अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या जुन्या वादानं डोकं वर काढलं होतं. पण आता सुजय विखें विरोधात राष्ट्रवादीने तुल्यबळ असलेले संग्राम जगताप यांनी उमेदवारी दिली आहे.

असं आहे नगरचं राजकारण

राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख हे नगर दक्षिणमधून 2004 मध्ये निवडून आले. पण 2009 नंतर राष्ट्रवादीचा या जागेवर कायम पराभव झाला. 2009 मध्ये शिवाजी कर्डिले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. भाजपच्या दिलीप गांधी यांनी त्यांचा पराभव केला. 2014 मध्ये राजीव राजळे यांना राष्ट्रवादीने तिकिट दिलं होतं. दिलीप गांधी यांनी त्यांचाही पराभव केला.

डॉ. सुजय विखेंची 'पोलिटिकल' सर्जरी यशस्वी

डॉ. सुजय विखे हे न्यूरोसर्जन. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणं ही न्यूरोसर्जनची खासियत. पण गेली काही महिने डॉ. सुजय यांना राजकारणातली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी झगडावे लागले. आणि अखेर ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी राजकारणात यशस्वी होण्याची वाट मात्र अवघड आहे.

चार पिढ्यांचा वारसा

अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटलांचं घराणं म्हणजे मोठं प्रस्थ. सहकार क्षेत्रात विखे पाटील घराण्याने आपला प्रभाव निर्माण केला. डॉ. सुजय हे विखे घराण्याची चवथी पिढी. त्यांचे पणजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. नंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकाराचं क्षेत्र विस्तारलं. नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर आता 37 वर्षांचे सुजय हे तो वारसा सांभाळत आहे.

सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विखे घराण्याने गेली पाच दशकं या जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण केला. मात्र डॉ. सुजय विखेंना राजकारण प्रवेशासाठी झगडावं लागलं. 2013-2014 मध्ये त्यांनी राजकारणात सुरूवात केली. त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे माजी केंद्रीय मंत्री. गांधी घराण्याचे एकनिष्ठ. मात्र त्यांचं शरद पवारांशी कधीच पटलं नाही. वडिल राधाकृष्ण पाटील हे विरोधीपक्ष नेते तर आई शालिनी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. बाळासाहेब विखे पाटलांनी अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेच प्रवेश केला होता. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्रीही होते.

 

VIDEO : भाषणाला ट्रोल करणाऱ्यांना पार्थ पवारांनी दिलं खणखणीत उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...