माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे - अमोल कोल्हे

माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे - अमोल कोल्हे

'माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही बॅनरवर वापरू नका' असा सल्लाही यावेळी अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

जुन्नर, 05 मार्च : अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केल्यानंतर ते जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना 'माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे 'छत्रपतींचा मावळा' असं अमोल कोल्हे म्हणाले. 'राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं आहे. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अमोल कोल्हा यांनी लगावला आहे.

या भाषणावेळी अमोल कोल्हे यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'सर्जिकल स्ट्राईक नेमकं केव्हा झालं हा मोठा प्रश्न आहे पण पेट्रोल डिझेल दरवाढ झाली हे नक्की' असं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

'लोकसभेचा उमेदवार देशाची पॉलिसी ठरवतो. शिरुर मतदार संघात जन्माला येणारा प्रत्येक जण मोठा भाग्यवान आहे. सर्वात मोठं प्रेरणास्थान या परिसरात आहे. एक शिवाजी महाराज आणि एक संभाजी महाराज' असंदेखील अमोल कोल्हे या भाषणावेळी म्हणाले.

दरम्यान, 'माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही बॅनरवर वापरू नका' असा सल्लाही यावेळी अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर '15 वर्ष शिवनेरीचा शिलेदार आहे असं म्हणणाऱ्याला छत्रपतींचं स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित करता आला नाही' असा आरोप करत त्यांनी आढळराव यांच्यावर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले की, ' मी टप्या-टप्याने सगळं बोलेल. ये तो सिर्फ झाकी है. पण हो माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे छत्रपतींचा मावळा' असं अमोल कोल्हे म्हणाले.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती याआधीच सूत्रांकडून मिळाली होती. आता अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित कोल्हे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.


आज सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे 5 VIDEO तुम्ही पाहिले का?

First published: March 5, 2019, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading