जन्मदात्रीनं टाकून दिलेल्या गार्गीला मिळाली मायेची सावली!

22 दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या गार्गीला जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या रूपात नवे आई-बाबा मिळाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2018 06:11 PM IST

जन्मदात्रीनं टाकून दिलेल्या गार्गीला मिळाली मायेची सावली!

प्रशांत बाग, नाशिक, 1 नोव्हेंबर - नाशिक-त्रंबकेश्वर मार्गावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळलेल्या नवजात स्त्री अर्भकाला त्रंबकेश्वर पोलीसांनी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 7 ऑक्टोबरपासून रुग्णालायत मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या त्या चिमुरडीला पोलिसांनी गार्गी अशी ओळख दिली. तिच्यावर मायेची सावली पांघरण्यसाठी धावून आल्या त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्नी रोहिणी दराडे. तब्बल 22 दिवसांच्या संघर्षानंतर गार्गीला नवी ओळख तर मिळालीच शिवाय तिच्या तिच्या जीवनात नवी पहाट देखील उगवलीय. गार्गीला जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या रूपात नवे खंबीर आई-बाबा मिळाले आहेत.

माणुसकी आणी ममता अजूनही जीवंत असल्याचं दाखवून देणारी एक घटना जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे घडलीय. मुलींचा जन्मदर कमी झालाय. मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, मुलाच्या हव्यासापोटी जन्माच्या आधीच मुलीची गर्भात हत्या. रस्त्यात कुठेतरी फेकलेलं अर्भक सापडलं. जन्मतः अर्भक रस्त्यावर फेकणारे निष्ठुर आई-बाप. विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेलं बेवारस मुल... अश्या अनेक बातम्या रोजच कानावर पडतात. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वरला अशीच एक घटना समोर आली. मात्र, घडलं काही वेगळंच.

7 ऑक्टोबर रोजी अशाच निष्ठूर माय-बापानं एका नवजात स्त्री अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून नाशिक-त्रंबकेश्वर मार्गाच्या कडेला टाकून पोबारा केला. नको असलेली अन्न एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ते फेकून द्यावं अशा अवस्थेत पडलेल्या त्या अर्भकाला मुंग्या लागल्या होत्या. ही वार्ता त्रंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना कळताच त्यांनी घटनास्थाकडे धाव घेतली आणि अत्यवस्थ असलेल्या त्या बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात (नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये) हलविलं.

एकीकडे चिमुरडीचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि दुसरीकडे तिला वाचवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू असतानाच पोलिसांनी तिचं 'गार्गी' असं नामकरण केलं. दरम्यान, गार्गीवर मायेची सावली पांघरण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या पत्नी रोहिणी दराडे या धाऊन आल्या. 22 दिवसांच्या या प्रवासात रोहिणी यांनी पोटच्या दोन मुलींना सांभाळ करत गार्गीला वाचविण्यासाठी जीवाचं रान केलं. हॉस्पिटल, डॉकटर, उपचार या सर्व गोष्टी सुरू असतानाच नको म्हणून टाकून दिलेल्या गार्गीला जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या रूपात नवे खंबीर आई-बाबा मिळाले.

''खरं तर सरकारी रुग्णालयाचं अत्यंत टिपिकल वातावरण असतं. रुग्णाला जे उपचार खासगी, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात, ते सरकारी रुग्णालयात मिळणं अवघड असतं. मात्र, सिव्हीलच्या स्टाफनं हे आव्हान यशस्वीरित्या पेललं. दुर्दम्य इच्छाशक्ती आणी अनुभवाच्या कौशल्यावर गार्गीच्या चेहऱ्यावर परत स्मित हास्य फुललंय'', अशी प्रतिक्रिया रोहिणी दराडे यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

Loading...

तर सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले की, ''एका मातेनं आपल्या या पोटच्या गोळ्याला, जनावरांना खायला रस्त्यात सोडून देण्याचा निष्ठुरपणा केला खरा. मात्र, या चिमुरडीला वाचवण्यासाठी अनेक मातांनी धडपड केलीय. 'चाईल्ड लाईन' या संस्थेनं गार्गीची जबाबदारी स्वीकारली असली तरी, रोहिणी दराडे यांची लहानी कन्या सारा तिच्या आईला हेच विचारतेय की, आई, गार्गीला घरी कधी आणायचं?''

उपचार पूर्ण होताच पोलीस गाडीत निघालेली गार्गी आता आपल्या नवीन घरी जायला निघालीय. अवघ्या काही दिवसांपूर्वी याच पोलीस गाडीतून तिला नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ आणण्यात आलं होतं. ती जगणार तरी कशी? असा यक्षप्रश्न सर्वासमोर उभा ठाकलेला असताना, तीचा पुर्नजन्मच झाला. परत एक नवी पहाट गार्गीच्या जीवनात उगवलीय...!!

 कल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...