News18 Lokmat

मध्यरात्री बँकेचं दार उघडलेलं, पोलिसांचा गराडा आणि धक्कादायक खुलासा

धोक्याचा अलार्म वाजल्याने पोलिसांनी बँकेला घेरलं आणि आतमध्ये प्रवेश केला पण नंतर जे कारण स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसही हादरून गेले.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 06:56 PM IST

मध्यरात्री बँकेचं दार उघडलेलं, पोलिसांचा गराडा आणि धक्कादायक खुलासा

प्रशांत बाग, 27 जून : दररोज होणाऱ्या घरफोडयांनी हादरलेल्या नाशिक शहरात मध्यरात्री एक थरारक घटना घडली आणि पोलीस प्रशासन हादरलं. शहरातील अंबड भागातील माऊली लॉन्स जवळील ठाणे जनता सहकारी बँकेचा आपत्कालीन सायरन वाजला आणि पोलीस ठाण्यात अलर्ट पोचला. तत्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागली नंतर जे उघडकीस आलं ते अतिशय धक्कादायक आणि सगळ्यांनाच हादरवणारं होतं. थोडक्यात दुर्घटना टळली नाहीतर अख्खी बँक लुटून नेली असती.

...आणि सायरन वाजला

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील शहरात नाही, झोन 2 चे उपायुक्त अमोल तांबे यांनी जलदगतीनं निर्णय घेतला. कंट्रोलला सावधान केलं, झोन एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तत्काळ नाकाबंदीसाठी पावलं उचलली...अंबड पोलीस ठाण्याचा नुकताच चार्ज घेतलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी आपल्या सहकाऱ्यांसह बँकेजवळ पोचले, दिसायला भयाण शांतता...बँकेला सर्व बाजुंनी अवघ्या 4 कर्मचाऱ्यांनी घेरलं. उपायुक्त अमोल तांबे हे टीमच्या नियमित संपर्कात राहून, आपत्कालीन परिस्थिती असल्यास, तत्काळ अतिरिक्त कुमकसह घटनास्थळी निघाले.

मुथुट फायनान्सवर नुकताच पडलेल्या दरोडयाचा, मोठ्या शिताफीनं पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात तपास लावला असला तरी शहरात दररोज होणाऱ्या घरफोड्या सुरूच असल्यानं, सगळयांचीच चिंता वाढली. आणी त्यांतच वाजलेला हा सायरन, पाहणी करतांना, बँकेच्या मागील बाजूस असलेलं लोखंडी दार उघडं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. मागवलेली अतिरिक्त कुमक पोचण्यातच होती. तरीही,तत्काळ आत घुसण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

धाडसी पोलीस अधिकारी

Loading...

मात्र आत नेमकं काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नसल्यानं,मुथुटच्या तपासात महत्वाची भूमिका बजावलेल्या पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी थेट बँकेत प्रवेश केला. सोबत त्यांना फक्त एका सहकाऱ्यानं कव्हर केलं होतं. लोखंडी दाराच्या आतील मुख्य दारही चक्क उघडं असल्यानं, बँक पूर्ण खुली होती.  दरम्यान, उपायुक्त अमोल तांबे यांनी बँकेच्या मॅनेजरला झोपेतून उठवलं. आणि या घटनेत जे उघड झालं ? ते फारच धक्कादायक आणी लाजिरवाण होतं.

धक्कादायक खुलासा

दिवसभर काम करून घरी गेलेल्या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आला आणि पोलिसही अवाक झाले. बँक बंद करून जातांना ते चक्क कुलूप लावायचचं विसरले होते.

कोट्यवधी रुपयांचा दैनंदिन व्यवहार होणारी  ठाणे जनता सहकारी बँकेची ही शाखा, आतमधून पूर्ण खुली होती. थेट स्ट्रॉँगरुमपर्यंत अगदी सहज कुणालाही जाणं शक्य होतं. दरम्यान, पोहोचलेल्या बँक मॅनेजरला सोबत घेऊन परोपकारी यांनी पूर्ण बँकेची पाहणी केली. सगळं आलबेल असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

जबाबदार कोण?

या बँकेत अत्यंत अद्ययावत अलार्म यंत्रणा आहे. दार उघडं असल्यानं तयार झालेल्या हवेच्या दाबानं हा सायरन वाजला. आणि पोलीस यंत्रणेची सतर्कता दिसून आली.  मात्र ही अद्ययावत यंत्रणा असली तरी एकही रात्रपाळीचा सुरक्षा रक्षक या ठिकाणी बँकेनं नेमला नसल्याचंही उघड झालं. आता हा खरोखर गलथानपणा होता का ? कोण कर्मचाऱ्यांनं संगनमत करून केलेली खेळी होती ? हे तपासात उघड होणार आहे. चूक झाल्याची कबुली, बँक मॅनेजरनं पोलिसांकडे दिली, माफीही मागितली ... पण या अश्या चुकीमुळं जर खरोखर दरोडा पडला असता तर? या प्रश्नाने पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना बेचैन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...