सरकारवर निशाणा साधत राणेंचं 'मिशन विधानसभा', मोर्चेबांधणी सुरू

नारायण राणे यांनी आतापासूनच आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 08:16 AM IST

सरकारवर निशाणा साधत राणेंचं 'मिशन विधानसभा', मोर्चेबांधणी सुरू

सिंधुदुर्ग, 22 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळ आले असताना नारायण राणे यांनी मात्र आतापासूनच आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी राणेंनी सर्वात आधी मच्छीमार एल्गार मेळावा घेउन पारंपरिक मच्छीमाराना पुन्हा एकदा आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे.

'सरकारने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडलं असून मच्छीमार जर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बाजूने राहिले तर त्यांचे सर्व प्रश्न सोडवू,' असं आश्वासन नारायण राणे यांनी दिलं आहे. '2014 मध्ये तुम्ही जो माझा पराभव केला तो माझ्याबद्दलच्या गैरसमजातून केला. मी कधीही पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात नव्हतो,' असं स्पष्टीकरण राणेंनी मालवणमधल्या पारंपरिक मच्छीमारांना दिलं आहे. याच मेळाव्यात आमदार नितेश राणे यांनी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौका पकडण्यासाठी एक हाय स्पीड बोट मच्छीमाराना मोफत दिली.

लोकसभा निवडणूक आणि नारायण राणे

सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

Loading...

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.


SPECIAL REPORT : अनेक हायप्रोफाईल लढतीत येणार धक्कादायक निकाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...