उन्हानं अंगाची लाही... नागपुरात पारा 43 वर; 'या' शहरातही वाढणार पारा

उन्हानं अंगाची लाही... नागपुरात पारा 43 वर; 'या' शहरातही वाढणार पारा

नागपुरात 30 मार्चला 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

  • Share this:

नागपूर, 30 मार्च: मार्च महिन्याच्या अखेरीलाच नागपूरकरांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. घर किंवा ऑफिसबाहेर पडताच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. भर दुपारी उन्हात बाहेर पडायला नको म्हणून अनेक जण घराबाहेर पडणंही टाळत आहेत. 30 मार्चला नागपुरात 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मार्च अखेरीसच शहरात उष्णतेची लाट आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हा पारा चांगलाच चढू शकतो अशी शक्यता आहे.

नागपूरखालोखाल नाशिकमध्येही दिवसागणिक उष्णतेचा पारा वाढतो आहे. नाशिकमध्ये तापमानानं चाळिशी ओलांडली आहे. मार्च महिन्यातच नाशिककर उन्हाने पुरते हैराण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १३८ गावं आणि ४४० वाडय़ांना एकूण १४० टँकरने पाणीपुरवठा होतो आहे.

मनमाड शहरात २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो आहे. येवल्यात कमी-अधिक फरकाने हीच स्थिती आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. गंगापूर धरणातला पाणीसाठा मागच्या वर्षीच्या तुलनेत मार्चमध्येच तब्बल 20 टक्क्यांनी घटला आहे. स्थानिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मार्चमध्येच उन्हानं नागरिकांचा घाम काढला आहे. दुसरीकडे पाण्यासाठी अनेक गावात वणवण सुरू झाली आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पाणीटंचाई आणि उन्हाच्या झळा दोन्हीचे तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच उन्हात जाताना आणि पाणी वापरताना दोन्हीची जाणीवपूर्वक काळजी घेणं आवश्यक आहे.


 

VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 08:48 PM IST

ताज्या बातम्या