मुंबई, 11 फेब्रुवारी : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. राष्ट्रभाषा हिंदी असली तर प्रदेशानुसार वेगवेगळ्या भाषा देशात बोलल्या जातात. महाराष्ट्राची मातृभाषा मराठीची राज्याच्या राजधानीतली अवस्था मात्र वाईट झाली आहे. मुंबईत बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मराठी माणसांची मुंबई ही खरी राजधानीची ओळख पण आता याच मराठीचा टक्का कमी होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या वाढत आहे.
दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011च्या जनगणना अहवालानुसार मुंबईत हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण तब्बल 40 टक्क्यांनी वाढले आहे. तर मराठी मातृभाषिकांचे प्रमाण मात्र 2.64 टक्के घटले आहे. 2001 मध्ये मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या जवळपास 26 लाख होती. त्यामध्ये वाढ होऊन 2011 ला ती 36 लाख इतकी झाली आहे.
मराठी भाषिकांची आकडेवारी धक्कादायक
मराठीच्या संदर्भात समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2001 ला 45 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचं सांगितलं होतं. तर दहा वर्षांनी 2011 मध्ये यात घट होऊन 44 लाखांवर मराठी भाषिक पोहचले.
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यातही हिंदी भाषिकांचे प्रमाण वाढले
मराठी भाषिकांचे प्रमाण फक्त मुंबईपुरतं मर्यादीत नाही. तर ठाणे आणि रायगडमध्येही मराठी मातृभाषा असलेल्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. ठाणे, रायगडमध्ये मुंबईच्या दुप्पट म्हणजे ८० टक्के हिंदी भाषिकांचे प्रमाण वाढलं आहे. याचा परिणाम इथल्या सामाजिक परिस्थितीवरही होत आहे. यात स्थानिक आणि बाहेरुन आलेल्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. यावरुन नेतेमंडळी राजकारणही मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
उत्तर भारतीयांच्या मुंबईक स्थलांतरात दुप्पट वाढ
स्थलांतराची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या 70 वर्षात 4 टक्क्यांनी घटले आहे. 1961 साली महाराष्ट्रातून मुंबईत स्थलांतरीत होणाऱ्यांचे प्रमाण 41 टक्के होते. तेच प्रमाण 2001 मध्ये 37 टक्के झाले. याऊलट उत्तर प्रदेशातून येणाऱ्यांच्या प्रमाणात मात्र दुपटीने वाढ झाली. 1961 ला उत्तर प्रदेशातून मुंबईत येणाऱ्यांचे प्रमाण 12 टक्के होते. ते 2001 मध्ये 24 टक्क्यांवर पोहचले. कमी वेतन असलेल्या ठिकाणी आणि जिथं काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही अशा ठिकाणी उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त आहे.
मराठी भाषिकांच्या स्थलांतराचे प्रमाण कमी पण लोखसंख्या जास्त
मराठी भाषिकांचं मुंबईत येण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी इतर भाषिकांपेक्षा मुंबईत मराठी मातृभाषा असलेल्यांची संख्या जास्त आहे. 2001 ला 45.24 लाख मराठी भाषिक मुंबईत होते. तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले. त्या तुलनेत गुजराती लोकांची संख्या 2001 ला 14.34 लाख होती. ती 2011 मध्ये 14.28 लाखांवर पोहचली.
हिंदीशिवाय उर्दू भाषिकांचे प्रमाणही जास्त
मराठी व्यतिरिक्त इतर भाषांचा विचार केल्यास दुसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषिक आहेत. 2001ला 25.82 लाख हिंदी भाषिक लोक होते. त्यांची संख्या 2011 मध्ये 35.98 लाख इतकी झाली. ही वाढ तब्बल 39.35 टक्के आहे. याशिवाय उर्दू बोलणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2001ला उर्दू भाषिक 16.87 लाख होते. तर 2011 ला यात घट होऊन 14.59 लाखांवर पोहचले.
मुंबईत जेव्हा कापड गिरण्या सुरु झाल्या तेव्हा महाराष्ट्रातून स्थलांतर होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्याआधी मुंबईला बंदराचे शहर म्हटलं जायचं. कापड गिरण्या सुरु होत्या तोपर्यंत कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर लोकं मुंबईत स्थायिक झाली. या लोकांची मातृभाषा मराठीच होती. जेव्हा कापड गिरण्यांमधील नोकऱ्या कमी झाल्या तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार येथून येणाऱ्यांचे प्रमाण वाढलं. मराठीचा टक्का कमी होऊन हिंदी भाषिकांचं वाढतं प्रमाण काळजी वाढवणारं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा