फुलांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई : एका 'फुलराणी'ची गोष्ट...

पदवीधर असलेल्या कविताताई लडकत यांनी दोन दशकांपूर्वी आपल्या शेतात फुलांची तसंच शोभेच्या झाडांची नर्सरी उभी केली. आज त्यांच्या नर्सरी व्यवसायानं गगनभरारी घेत लाखोंची उलाढाल करण्यात यश मिळवलंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 09:29 PM IST

फुलांच्या व्यवसायातून लाखोंची कमाई : एका 'फुलराणी'ची गोष्ट...

बाळासाहेब काळे, पुणे, 22 ऑगस्ट : पुण्यापासून जवळ असलेल्या दौंड तालुक्यातल्या देऊळगाव गाडाची गावात धनंजय आणि कविता लडकत हे दांम्पत्य राहातं. इथं त्यांची जेमतेम शेती आहे. त्यामुळं धनंजय यांनी पुण्याला नोकरी करत पत्नीला शेतीमध्ये व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं. पदवीधर असलेल्या कविताताईंनी दोन दशकांपूर्वी आपल्या शेतात फुलांची तसंच शोभेच्या झाडांची नर्सरी उभी करण्याचा मानस आपल्या पतीजवळ बोलून दाखवला आणि तो सत्यातही उतरवला. आज त्यांच्या नर्सरी व्यवसायानं गगनभरारी घेत लाखोंची उलाढाल करण्यात यश मिळवलंय. तब्बल 2 दशकं कष्ट केल्यानंतर त्यांना हे यश मिळालंय. जाणून घेऊयात या उद्यमशील शेतकरी महिलेची यशोगाथा...

हल्ली नर्सरीचा व्यवसाय सगळेच करतात. पण महानगरांच्या जवळ या व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत कविता लडकत ही अतिशय चिकाटीनं उभी राहिलीय. तब्बल 2 दशकांपेक्षा जास्त संघर्ष करत आज ती वार्षिक कोट्यावधीं रुपयांची उलाढाल करतेय. शिवाय 35 ते 40 मजुरांच्या हातालाही तिने रोजगार दिलाय.

कविता ताईंनी आज तब्बल 10 एकर क्षेत्रात 'जगदंबा नर्सरी' नावानं आपल्या कामाचा मोठा दबदबा निर्माण केलाय. प्रामाणिकपणे कष्ट करत राहिल्यानं त्यांना यश मिळालंय. अनेक वर्षांपासून त्या पुण्यात फुलशेतीचा व्यवसाय करतात. आता मात्र त्यांच्या कामाचा व्याप वाढला असून देशातल्या किमान 4 ते 5 राज्यांमध्ये त्यांची रोपं विक्रीसाठी जाऊ लागली आहेत.

धनंजय यांनादेखील शेतीची आवड होती. पत्नीनं कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. उलाढाल वाढल्यानंतर आणि व्यवसायात यश येऊ लागल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ नर्सरीचं काम करायला सुरुवात केली. आज त्यांच्याकडं फुला-फळांची रोपं उपलब्ध आहेत. सुधारीत ३० प्रकारचे विविध रंगी गुलाब, १५ प्रकारचे जास्वंद, शेवंती, जरबेरा, आदी शोभेची झाडं तसंच सुधारित आंबा, सीताफळ, डाळिंब, मोसंबी, संत्रा, जांभूळ, आवळा, पेरु, चिक्कू अशा १३० प्रकारच्या फुला-फळांच्या वेगवेगळ्या जातीच्या रोपांची ते विक्री करतायत.

नर्सरीत तयार झालेली ही रोपं महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूसह राजधानी दिल्लीतही विकली जातात. याशिवाय कलकत्ता, गुजरात, आंध्रप्रदेश इथून विविध जातीची रोपं विक्रीसाठी आणली जातात. या किरकोळ विक्रीसोबत होलसेल विक्रीतून त्यांना आज महिन्याला लाखोंचं उत्पन्न मिळू लागलंय. जवळपास 1 कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे. खर्चाचे निम्मे पैसे वगळले तरी वार्षिक 40 ते 50 लाखांची कमाई ते करतायत.

Loading...

महिलांनी ठरवलं तर त्या कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर जातात. हे आपण नेहमीच पाहतो. पण कविता आणि धनंजय लडकत यांनी केवळ रोपं विकून 20 वर्षात उभं केलेलं हे यश नक्कीच भव्यदिव्य म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...