S M L
LIVE NOW

मराठी भाषादिनानिमित्त आज दिवसभर न्यूज 18 लोकमतवर 'जागर मराठीचा'

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. मराठीच्या सेवेला वाहून घेणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो

Lokmat.news18.com | February 27, 2018, 2:07 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated February 27, 2018
auto-refresh

Highlights

27 फेब्रुवारी: संतांची परंपरा लाभलेली, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासात भेटलेल्या अनेक भाषांना आपलेसे करत विकसित झालेली आणि आधुनिक युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या १० भाषांत स्थान पटकावणारी अशी ‘माझी बोली मराठीया’. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. मराठीच्या सेवेला वाहून घेणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिनच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या भाषेतील साहित्यिकाच्या जन्मदिनी त्या भाषेचा उत्सव साजरा व्हावा, असे हे जगभरातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या माय मराठीला स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे कुसुमाग्रज या मायबोलीचे अमृतपुत्र ठरले आहेत. या कविश्रेष्ठाला मानाचा मुजरा...  
नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल
माझी मराठी माऊली
तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी
माझा मराठी गुलाल
त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास
माझ्या मराठी मातीची
खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ
- अशोक बागवे
................................................................................ ........................................
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान
 
हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशांतील शिळा
- कुसूमाग्रज
  ----------------------------------------------------------------- लाभले अाम्हास भाग्य लाभले अाम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी येथल्या फुलाफुलात हासते मराठी येथल्या दिशादिशात दाटते मराठी येथल्या नगानगात गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळीकळीत लाजते मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी - सुरेश भट
Load More

Live TV

News18 Lokmat
close