गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याने अनेक प्रश्न केले उपस्थित.. वाचा, SPECIAL REPORT

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याने अनेक प्रश्न केले उपस्थित.. वाचा, SPECIAL REPORT

आदिवासींकडे बारुद येणार कुठून, जांभुळखेडामध्ये झालेल्या स्फोटात शहीद झालेल्या दयानंद सहारे यांच्या आईनेही माओवाद्यांना स्फोटके हे स्थानिक राजकारण्यांच्या मदतीशिवाय मिळू शकणे शक्य नाही. असा आरोप शहिद जवान दयानंद यांची आई शकुंतला सहारे यांनी केला आहे.

  • Share this:

महेश तिवारी/ प्रवीण मुधोळकर(प्रतिनीधी)

गडचिरोली, 3 मे- महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दोन नक्षलवादी हल्ल्यांनी संपूर्ण राज्य हादरले .आता या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे राज्य सरकरने सांगितले आहे. पण पोलिस आणि गृहखात्याच्या चुकांमुळे माओवादी आपल्या प्रयत्नात यशस्वी झाले का, असा प्रश्नही काही घटनांनी उपस्थित केला आहे. गडचिरोलीमधील जांभुळखेडा स्फोटाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

माओवाद्यांनी गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा परिसरात भीषण स्फोट घडवून आणला. माओवादी विचार डोक्यात शिरल्यामुळे त्यांनी केलेल्या राक्षसी क्रुरतेचा अंदाज समोर आलेल्या दृष्यांवरुन येतो. माओवाद्यांनी मोठ्या क्षमतेने इंडस्ट्रियल इक्स्पोझिव्हस वापरून हा स्फोट घडवला. स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की जवानाच्या शरीराचे तुकडे- तुकडे झाले आणि ते परिसरातील झाडांवर उडाले. स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज चक्नाचूर झालेल्या या पोलिसांनी वापरलेल्या गाडीवरून लावला जाऊ शकतो.

'माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एक्सस्पोझिव्ह या संपूर्ण घटनेसाठी वापरले गेलेत. ते कोणते होते त्याचा शोध केमिकल अॅनालिसिस नंतर होईल. या स्फोटात सर्व 15 जवानांकडील शस्त्रेही नष्ट झाली. एवढा तो मोठा स्फोट होता.'

- सुबोध कुमार जैस्वाल, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलिस

माओवाद्यांच्या रक्तरंजित हल्ल्यामुळे 20 वर्षांत 12000 बळी...

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 1998 ते जुलै 2018 आकडेवारीनुसार, मागील 20 वर्षांत देशभरात माओवाद्यांच्या हल्ल्यात 12000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2700 पोलिस विविध हल्ल्यांच शहीद झाले आहे. देशभरातील 10 राज्यांमधील 28 जिल्ह्यांमध्ये माओवादी कार्यरत आहेत.मुळात जांभुळखेडा गावाजवळील हा स्फोट घडविण्याआधी दादापूर गावाजवळ माओवाद्यांनी हायवेच्या कामावरील कंत्राटदार कपंनीचे 27 ट्रक आणि मशिनरी जाळून टाकली. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम सुरु ठेवण्यासाठी माओवाद्यांनी एक कोटी खंडणी मागितली होती. शिवाय माओवाद्यांनी कंत्राटदाराला धमकविण्यासाठी याच ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची बाईकही पेटवली होती. पण हे प्रकरण कुठेही पुढे आले नाही आणि पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे माओवादी आपल्या प्रयत्नात यशस्वी झाले.

दुसरीकडे, आम्हाला हा रस्ता हवा आहे. आता जरी या गाड्या जाळल्या असल्या तरी हे काम लवकरात लवकर होऊन रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. आता माओवादी असा रक्तरंजित खेळ खेळत असताना पुन्हा परिसरात नागरिकांना धमविण्यासाठी हाताने लिहिलेले बँनर्स माओवाद्यांनी लावले आहेत. रस्त्याचे काम होऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यात परिसरात रोड तयार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरलाही माओवाद्यांनी धमकी दिली आहे.

मुळात गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र पोलिसांनी 45 पेक्षाही जास्त माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केल्यामुळे गडचिरोलीच्या परिसरात माओवाद्यांची शक्ती कमी झाली होती. राज्याच्या गृहखात्याने जिल्ह्यातील संवेदनशील आणि माओवाद्यांच्या कारवाया तीव्र असणाऱ्या भागात 15 पोलिस स्टेशन्सना मंजुरी दिली आहे. माओवाद्याची ताकद कमी झाल्यामुळे पोलिस स्टेशन्स बांधणे शक्य होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे असे हल्ले वाढले आहेत आणि नाहक जवान आणि नागरिक मारले जात आहेत.

काय म्हणतात नक्षलविरोधी कार्यकर्ते...

'आम्ही या पोलिस स्टेशन्ससाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करतोय. पण अद्याप काही कारवाई नाही. मंजुऱ्या दोन प्रकारच्या असतात. त्यापैकी दोन्ही मंजुऱ्या मिळाल्यात, पण कारवाई का नाही, असा सवाल नक्षलविरोधी कार्यकर्ते

अरविंद सोवनी यांनी उपस्थित केला आहे.

हल्ल्यांनंतर राजकारण सुरु..

माओवाद्यांच्या हल्ल्यांनंतर राज्यात आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी लाईड्स या कंपनीने जमीन खननासाठी आणलेले स्फोटके वापरून नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यात घडविलेल्या स्फोटासाठी वापरले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. लाईड्स या कंपनीला लोहखनिज काढण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड तालुक्यात राज्य सरकारने अर्धसैनिक दलाची सुरक्षा दिली आहे. आता या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, लॉइड आणि नक्षलवाद्यांचा संबंध शोधण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. गडचिरोली येथील सुरजागड लोह प्रकल्पाच्या माध्यामातून सरकार जनतेला लुटण्याचे काम केले जात आहे. स्थानिकांना या ठिकाणी रोजगार नाही मुख्यमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही नाना पटोले म्हणाले.

शहीद जवानाच्या आईने केले धक्कादायक आरोप...

'आदिवासींकडे बारुद येणार कुठून, जांभुळखेडामध्ये झालेल्या स्फोटात शहीद झालेल्या दयानंद सहारे यांच्या आईनेही माओवाद्यांना स्फोटके हे स्थानिक राजकारण्यांच्या मदतीशिवाय मिळू शकणे शक्य नाही. असा आरोप शहिद जवान दयानंद यांची आई शकुंतला सहारे यांनी केला आहे. दरम्यान, माओवाद्यांनी घडविलेल्या या घटनांमुळे गंभीरतेने घेऊन माओवादांचे कंबरडे मोडणे आवश्यक आहे. नाहीतर अशाच घटना होत राहिल्या तर माओवाद्यांचे शहरांकडे वळलेले पावले थांबविण्याचे आव्हान सुद्धा कठीण होत जाईल.


VIDEO: शहीद जवान तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या