News18 Lokmat

विधानसभेसाठी वंचितने काँग्रेसला दिला आघाडीचा फॉर्म्युला, 'इतक्या' जागा लढवणारच!

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:26 PM IST

विधानसभेसाठी वंचितने काँग्रेसला दिला आघाडीचा फॉर्म्युला, 'इतक्या' जागा लढवणारच!

मुंबई, 3 जुलै : लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला आहे.

'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीतर्फे अण्णाराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.

वंचितच्या या फॉर्म्युल्यामुळे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. कारण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीने थेट 248 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसने फक्त 40 जागा लढवाव्यात, असं वंचितचं म्हणणं आहे. त्यामुळे वंचितच्या या ऑफरवर काँग्रेस काय प्रतिक्रिया देते, हे पाहावं लागेल.

एकीकडे वंचित बहुजन आघाडीसोबत अद्याप आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नसताना आणखी एका पक्षाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,' असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीच्या अडचणींत भर पडली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेत काँग्रेसला फटका बसला होता. तो धोका टाळण्यासाठी वंचितशी आघाडीचा पर्याय काँग्रेसने खुला ठेवला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

Loading...

VIDEO गर्दीचा फायदा घेत खिसे कापणाऱ्या चोराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...