मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण, मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

मुख्यमंत्र्याचं असंही राजकारण, मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

देवेंद्र फडणवीस आषाढी वारीच्या निमित्ताने कोणकोणत्या नेत्याना भेटी देतात आणि नेमकी काय बोलणी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

  • Share this:

सोलापूर, 11 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरमध्ये जाणार आहेत. यावेळी व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून ते सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत .

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील बडे नेते मुख्यमंत्री त्यांच्याकडे चहापानासाठी, भोजनासाठी येणार असल्याचे सांगत होते. अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यात मात्र ते जुने मोहिते -पाटील विरोधक राजकुमार पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी वारीच्या निमित्ताने कोणकोणत्या नेत्याना भेटी देतात आणि नेमकी काय बोलणी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुगली टाकून जिल्ह्यातील सर्व नेत्यांना मात्र आश्चर्यचकित केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते अशी ओळख असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपशी सलगी केल्याचं पाहायला मिळालं. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी उघडपणे भाजपचे काम केले. त्यामुळे मोहिते पाटीलांची भाजपसोबत जवळीक वाढत असतानाच आता मुख्यमंत्री त्यांच्या एकेकाळच्या कट्टर राजकीय विरोधकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगत आहे.

मोहिते पाटील आणि भाजप

राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली माढ्याची जागा जिंकण्यात यंदा भाजपला यश आलं. या मतदारसंघात भाजपला मोठा विजय मिळवून देण्यात सर्वाधिक वाटा राहिला तो मोहिते पाटील कुटुंबाचा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरीही या निवडणुकीत त्यांनी थेट भाजपला मदत करणारी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भाजप उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून एक लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य देऊ, असा शब्द या निवडणुकीदरम्यान मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा मोहिते पाटील यांचा शब्द खरा ठरल्याचं दिसून आलं. याच तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली.

VIDEO: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाई करताना पोलिसांची महिलेला मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 09:31 AM IST

ताज्या बातम्या