News18 Lokmat

भाजपच्या गुंडांचा शेतकऱ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

ठाण्यामध्ये 17 मे रोजी मनसेचा शेतकरी मोर्चा निघणार आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आवाहन.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 09:10 PM IST

भाजपच्या गुंडांचा शेतकऱ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

ठाणे, 16 मे : आंबे विक्री स्टॉल लावण्यावरून ठाण्यातील मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांचा वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. आंबा विक्रेत्यावरून सुरू झालेला भाजप-मनसेचा राडा आता अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शुक्रवारी (17 मे)दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ठाणे महानगरपालिकेवर  शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज ठाकरेंनी पत्रक काढून स्पष्ट केली भूमिका

नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?

शेतकरी बाजार पेठांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व गुंड अशावेळी प्रशासनावर दबाण आणून शेतकऱ्यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करतात. अशा पद्धतीनं ठाण्यामध्ये रत्नागिरीचा एक शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून नौपाडा विभागामध्ये आंब्याच्या हंगामामध्ये आंबे विक्रीचा व्यवसाय करत होता. भाजपचे दहा नगरसेवक, एक जिल्हाध्यक्ष आणि असंख्य भाड्यानं लोक येऊन बळजबरीनं जर त्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला हटवत असतील आणि त्या शेतकऱ्याचा लाखभर रुपयांचा माल जप्त करून त्याच्या वार्षिक लाखभर रुपयाचे नुकसान केले जात असेल तर ते सहन करणे कितपत योग्य आहे. शेतकऱ्यावर झालेल्या या प्रकाराला मनसेचे जिल्हाध्यक्ष तसंच महाराष्ट्र सैनिकांनी कडवा प्रतिकार केला. पण सत्तेचा दुरुपयोग करून पालिकेची मिळालेली परवानगी रद्द करून त्या शेतकऱ्याला पिटाळले जाते. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही तर ही एक प्रातिनिधीक घटना आहे, असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. म्हणूनच शुक्रवारी 17 मे रोजी दुपारी 1 वाजता ठाण्याच्या गावदेवी मैदापासून ठाणे महापालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होऊन सहकार्य करणे व केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकऱ्यांसाठी केवळ जागाच नव्हे तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासनाला भाग पाडणार. बाकी प्रश्नावर  राज्यस्तरावर जे काही करायचे आहे ते मी करेनच परंतु तुर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवलाच पाहिजे.- राज ठाकरेनेमका काय आहे वाद?

फूटपाथवर आंब्याचा स्टॉल लावण्यावरून ठाण्यातभाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले होते.  9 मे रोजीची ही घटना आहे. यावेळेस पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जदेखील केला होता. ठाण्यातील विष्णुनगर येथे मनसेचे मध्यवर्ती कार्यालय आहे, त्या शेजारीच फूटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधा उपक्रमांतर्गत हा स्टॉल उभारण्यात आला होता. मात्र हा स्टॉल फूटपाथवर असल्याने भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी यास विरोध केला.  दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका, अशी भूमिका मनसेने घेतली. पण यावरूनच भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राडा झाला.

मोर्चामध्ये राज ठाकरे नसणार ?


दरम्यान,शेतकरी मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. काही खासगी कारणास्तव राज ठाकरे गैरहजर राहणार असल्याचं  म्हटलं जात आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...