मुंबई, 21 मार्च : राज्यातील मंत्रीच गुंडाना पोसत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केला. यासंदर्भात त्यांनी 'मंडी टोळी' नावाच्या एका कुख्यात टोळीचे उदाहरण दिले.
नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामाच केला. ते म्हणाले, एका मंत्र्याच्या शहरात 'मंडी टोळी' नावाची एक कुख्यात टोळी आहे. या टोळीकडे किमान ४ हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुल करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करते. या सरकारच्या ‘कौशल्य विकास योजने’त शाम जयस्वाल आणि बंटी जयस्वाल यांच्या या मंडी टोळीचे गुन्हेगारी कौशल्य प्रचंड विकसित झाले आहे. आज त्या शहरात इतकी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे की, त्यांच्याविरूद्ध ब्र उच्चारण्याचीही कोणाची ताकद राहिलेली नाही. या टोळीला राज्यातील एका मंत्र्याचाच खुला पाठिंबा आहे की नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर विभागाकडून खातरजमा करावी अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई शहराजवळ राहणाऱ्या एका मंत्र्यांच्या चेल्यांने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हैदोस घातला आहे. कारखान्यांवर बनावट धाडी घातल्या जात आहेत. त्यांच्याकडून खंडणीवसुली होते आहे. नगरसेवकांच्या खुनाच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. राज्यातील मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत, गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालत आहेत. तरीही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष का करतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा