पश्चिम महाराष्ट्र : माढा, बारामती आणि सातारा...पवारांच्या बालेकिल्ल्याला फडणवीसांचं आव्हान

पश्चिम महाराष्ट्र : माढा, बारामती आणि सातारा...पवारांच्या बालेकिल्ल्याला फडणवीसांचं आव्हान

पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता.

  • Share this:

मुंबई, 10 मे : यंदाची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात आधी काँग्रेस आणि 1999 नंतर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पानिपत झालेलं पाहायला मिळालं. अशातही राष्ट्रवादीला ज्या चार जागांवर विजय मिळाला त्या चारही जागा पश्चिम महाराष्ट्रातील होत्या.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

कोणत्या जागेवर काय आहे स्थिती?

1. माढ्यात पवार Vs भाजप

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली.

2. बारामतीत पवारांच्या गडाला भाजपचं आव्हान

बारामतीत यंदा इतिहास घडणार असून शरद पवार यांचा गड आम्ही काबीज करू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपकडून करण्यात आला. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे मैदानात आहेत, तर भाजपकडून नवख्या कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सातत्याने होणाऱ्या सभा आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट बारामतीत ठोकलेला तळ, यातून पवारांचा बालेकिल्ला जिंकण्यात भाजपला यश मिळते का, हे पाहावं लागेल. बारामती मतदारसंघात 2014 च्या तुलनेत यावेळी दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ झाली आहे.

बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत 58. 83 टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी 61. 58 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. बारामती मतदारसंघात आता वाढलेली दोन लाख 32 हजार 829 मते निर्णायक ठरणार आहेत. ही वाढलेली मते नेमकी कुणाच्या बाजूने झुकतात, यावर या मतदारसंघातील विजयाचं गणित ठरू शकतं.

3. मावळ

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी देण्यात आली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता होती. पण ही लढाई जिंकणं श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार दिला. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीने जोरदार टक्कर दिली आहे. या पार्श्वभूमीवर मावळमधील लढत चुरशीची ठरली.

4. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीसमोर जागा राखण्याचं आव्हान

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक आणि शिवसेनेकडून संजय मंडलिक हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे धनंजय महाडिक यांच्यावर नाराज होते. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा धनंजय महाडिकांवर वरदहस्त असल्याचं बोललं जातं. त्याच्या जोरावरच धनंजय यांना पुन्हा राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं, असं मानलं जातं आहे.

धनंजय महाडिक यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कितपत मदत केली याबाबत शंका आहे. सतेज पाटील यांच्या गटाने महाडिक यांना उघड विरोध केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी जिंकणार की शिवसेना बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

5. हातकणंगले

हातकणंगले मतदारसंघात विद्यमान खासदार आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेनं धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. धैर्यशील माने हे राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहे. खासदार राजू शेट्टी यांचा या भागातील मतदारांसोबत चांगला संवाद आहे. तर दुसरीकडे, युवा असेलल्या धैर्यशील माने यांनीही राजू शेट्टींसमोर चांगलं आव्हान निर्माण केलं आहे.

6. सोलापूर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत रंगली. कारण सोलारपुरातून काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीतून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी रिंगणात होते.

प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना धक्का देत अकोल्यासह सोलापुरातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे इथून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे सोलापुरातील समीकरण?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. आधीच भाजपचं आव्हान आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांची एंट्री यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात मराठा, धनगर समाजाप्रमाणेच मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात चांगली कामगिरी करू शकते, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

7. सांगली

सोलापूरप्रमाणे सांगलीतही यंदा तिरंगी लढत रंगली. महाआघाडीकडून स्वाभिमानीच्या तिकीटावर विशाल पाटील, भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात चुरशीचा सामना झाला. या मतदारसंघातबाबत अंदाज बांधताना मोठ-मोठ्या राजकीय विश्लेषकांची दमछाक झाली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

8. सातारा

साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात युतीने नरेंद्र पाटील यांना उभं केलं आहे. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. या मतदारसंघात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग असून तो फक्त उदयनराजे या नावानेच प्रभावित होणार आहे. नरेंद्र पाटीलांनी उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण केलं असलं तरीही ते विजयापर्यंत पोहचणार का, याबाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

9. शिरूर

पश्चिम महाराष्ट्रातील हा मतदारसंघ 2008 साली तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव-पाटीलांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला लागूनच आहे. असं असलं तरीही मागील दहा वर्षांत ही जागा राष्ट्रवादीला जिंकता आलेली नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी थेट लढत होत असते. यंदा राष्ट्रवादीने नवी खेळी खेळत आधी शिवसेनेतच असणारे अभिनेते अमोल कोल्हे यांना तिकीट दिलं. प्रचारादरम्यान अमोल कोल्हे यांना महिला आणि तरूण वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे, आढळराव यांना 15 वर्षांच्या काळात तयार झालेल्या अॅन्टी-इन्कमबन्सीचाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु आढळराव पाटील यांचं या भागात चांगलं संघटन आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार, याबाबत अंदाज बांधणं कठीणं झालं आहे.

10. पुणे

पुण्यात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठं मताधिक्य घेत विजय मिळवला होता. मात्र यंदा भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करत गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे, उमेदवार जाहीर करताना काँग्रेसचा चांगलाच गोंधळ उडाला. अखेर काँग्रेसने मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. काँग्रेसच्या तुलनेत भाजपचे गिरीश बापट अधिक उजवे असल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे या मतदारसंघात सुरुवातीपासूनच गिरीश बापट यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालं.


SPECIAL REPORT: पवारांचा किल्ला ढासळणार की मजबूत होणार? हे समीकरण ठरवणार बारामतीचा खासदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या