माढ्यात मोदींची सभा, विजयसिंह मोहिते पाटीलही हाती कमळ घेणार?

राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 09:50 AM IST

माढ्यात मोदींची सभा, विजयसिंह मोहिते पाटीलही हाती कमळ घेणार?

अकलूज, 17 एप्रिल : माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे.

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्यातील दिग्गज नेते राहिले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आज अकलूजमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींची आजची माढा मतदारसंघासाठी ही सभा होत असली तरी बारामती मतदारसंघासाठीही हीच सभा असल्याचं भाजपने स्पष्ट केलंय. मोदी यांची बारामती मतदारसंघातील सभा रद्द झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला बारामतीत सभा घेणार आहेत.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

Loading...

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

शिंदे घराणं हे माढ्याच्या राजकारणात मोठं नाव राहिलं आहे. संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. त्यांना या पदासाठी भाजपने साथ दिली होती. भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून ते गेले काही दिवस लढत असले, तरी त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नव्हता. आता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली.

माढ्यातल्या मोहिते पाटील घराण्याशी शिंदेंचं कधीच जमलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे संजयमामा शिंदे हे धाकटे बंधू. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून त्यांनी भाजप पुरस्कृत युतीत सामील झाले होते. 2014 ची विधानसभा निवडणूक लढले ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून. करमाळ्यातून लढत असताना त्यांचा पराभव झाला. माढ्यातून लोकसभा लढवणारा ताकदीचा उमेदवार म्हणूनच संजयमामांकडे भाजपनेही पाहिलं होतं. त्या वेळी शरद पवार स्वतः लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढवणार अशी चर्चा होती. पण रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि माढ्याची गणितं बिघडली. शरद पवार यांनीसुद्धा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि तेव्हापासून माढ्याचा तिढा काही सुटता सुटत नव्हता.

भाजप आणि राष्ट्रावादी दोन्ही परस्परविरोधी पक्षांनी वेगवेगळ्या वेळी संजय शिंदेंवर विश्वास दाखवण्याची तयारी दाखवलेली होती, हीच संजयमामांची ताकद आहे, असं त्यांचे समर्थक सांगतात. ते इतर कुठल्या पक्षात फार रमले नाहीत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी चुरस वाढणार आहे.


SPECIAL REPORT: नागपुरात डबल मर्डरचा अखेर उलगडा; 'या' कारणासाठी चंपाती दाम्पत्याची हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...