नगरच्या राजकारणाला पुन्हा तेच वळण, भाजपच्या सुजय विखेंना धक्का?

नगरच्या राजकारणाला पुन्हा तेच वळण, भाजपच्या सुजय विखेंना धक्का?

अहमदनगरचं राजकारण हे पक्षनिष्ठेपेक्षा तिथल्या नात्यांच्या गुंत्यासाठी ओळखलं जातं.

  • Share this:

अहमदनगर, 21 एप्रिल : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात आहेत.

नगरच्या राजकारणात आता पुन्हा एकदा नात्या-गोत्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील जर भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखेंचा प्रचार करणार असतील तर आम्ही आमच्या जावयाला मदत का करू नये,' असा सवालच कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. अहमदनगरचं राजकारण हे पक्षनिष्ठेपेक्षा तिथल्या नात्यांच्या गुंत्यासाठी ओळखलं जातं. या निवडणुकीतच्या शेवटच्या टप्प्यातही असंच चित्र निर्माण होताना दिसत आहे. कारण कर्डिले यांनी सुरूवातीला जाहीर केलं होतं की ते भाजपचाच प्रचार करतील. आता मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. कर्डिले यांचे कार्यकर्ते उघडपणे संग्राम जगतापांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार सुजय विखेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

नगरमध्ये रंगणार जोरदार लढत

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.


प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 09:24 AM IST

ताज्या बातम्या