ठरलं! पुण्यातील काँग्रेस उमेदवार 3 एप्रिलला भरणार फॉर्म

ठरलं! पुण्यातील काँग्रेस उमेदवार 3 एप्रिलला भरणार फॉर्म

पुणे मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यास काँग्रेस करत असलेला विलंब हा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

पुणे, 1 एप्रिल : 'पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,' अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पण उमेदवार कोण असणार, याबाबत मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

पुणे मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यास काँग्रेस करत असलेला विलंब हा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण उमेदवार घोषित झालेला नसताना काँग्रेसने प्रचारलाही सुरुवात केली आहे. आता तर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचा उमेदवार 3 तारखेला अर्ज दाखल करेल, असं म्हटलं आहे. पण उमेदाराचं नाव मात्र जाहीर केलेलं नाही.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या शुक्रवारी (5 एप्रिल)पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत. राहुल गांधींची सभा चार दिवसांवर आली तरीही अद्याप उमेदवारीचा घोळ संपलेला नाही, अशी परिस्थिती आहे.

पुणे मतदार संघात भाजपने गेल्या वेळी निवडून आलेले खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी आमदार गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. युतीचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले, तरी काँग्रेसचा उमेदवार अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही.मोहन जोशींपासून सुरेखा पुणेकर पर्यंत अनेक नावांची चर्चा झाली, पण काँग्रेसकडून अद्याप कुठल्याच नावाची घोषणा झालेली नाही.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा मात्र झालेली आहे. त्यात ते 5 मार्चला पुण्यात सभा घेणार असल्याचं स्पष्ट आहे. राहुल यांच्या महाराष्ट्रात त्या दिवशी 2 सभा होतील. पहिली वर्ध्यात आणि दुसरी पुण्यात. पुण्यात ते कुठल्या उमेदवाराचा प्रचार करणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 23 एप्रिलसाठी होणाऱ्या मतदानासाठी अर्ज भरण्याची अंतीम मुदत 4 एप्रिल आहे. त्यामुळे राहुल यांच्या सभेआधी नक्कीच पुण्याचा उमेदवार ठरलेला असेल. शेवटच्या क्षणी कुणाला तिकीट मिळणार याबाबत आता उत्सुकता आहे.

पुण्यात काँग्रेसकडून चर्चेत असणाऱ्या उमेदवारांच्या नावांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर आहे. ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अरविंद शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. पुणे काँग्रेसचे मोहन जोशी यांची वर्णी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचंही नाव मध्यंतरी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून चर्चेत होतं.  या सगळ्यांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


EXCLUSIVE : राजकारणात चारित्र्याबाबत आरोप झाल्यावर वेदना होतात? नवनीत राणांची मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या